त्र्यंबोली अथवा टेंबलाई



शहराच्या पूर्वेला एका छोट्या टेकडीवर काही देवळांचा समूह आहे. तिथेच त्र्यंबोलीचे मंदीर आहे. या टेकडालाही टेंबलाई नावानेच ओळखले जाते. त्र्यंबोली किंवा टेंबलाई ही अंबाबाईची (श्री. महालक्ष्मी) बहीण मानली जाते. त्र्यंबोली ही अंबाबाईशी भांडण झाल्यामुळे शहराबाहेरील टेकडीवर जाऊन राहिली अशी समजूत आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा अंबाबाई ही त्र्यंबोलीची समजूत काढण्याकरिता जात असते. त्या दिवशी(अश्विन शुक्ल पंचमी, ललिता पंचमी - स्थानिक शब्द - कवाळ पंचमी) या घटनेचे प्रतीक म्हणून यात्रा भरविली जाते. अंबाबाईची प्रतिमा पालखीतून मिरवणुकीने गाजत वाजत नेली जाते. या मिरवणुकीत राजघराण्यातील व्यक्ती, अमीर उमराव, सरदार, मानकरी इत्यादी लोक भाग घेत असत. ही मिरवणूक खास बघण्यासारखी असे. इतर लवाजम्यात हत्ती, घोडे, वाघ, उंट इत्यादी प्राणी मोठ्या थाटात नेत असतात. त्यावेळी म्हैसूरच्या दसऱ्याची आठवण निघत असे. सध्या काहीही पहावयास मिळत नाही. नाममात्र छोटीशी मिरवणूक नेली जाते.