सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

'इकॉनॉमी' बदलतेय..

कोल्हापूरकडे देशातील एक सधन जिल्हा म्हणून पाहिले जात असले तरी अलीकडच्या दशकातच कोल्हापूरचा विकास झपाटय़ाने झाल्याचे वास्तव आह.े औद्योगिक क्षेत्रातील भरारी, व्यापार उदिमात झालेली वाढ, परांपरागत शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे वाढलेला शेतकर्‍यांचा कल, लोकांचे सुधारलेले राहणीमान, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही कोल्हापूरने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेला नावलौकिक या सर्वामुळे कोल्हापूरचे अर्थकारण गतिमान होताना दिसत आहे. कोल्हापूरच्या 'इकॉनॉमीची ग्रोथ' कमालीची वाढत असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल निश्चितच समाधानकारक आहे.कलानगरी ही मूळ ओळख असलेला जिल्हा म्हणजे कोल्हापूर. 2000 ते 2012 या साधारण बारा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्याची सधनता वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच केवळ परंपरागत शेती करण्याऐवजी नोकरी, व्यापार, व्यवसाय, उद्योग आदीमध्ये कोल्हापूरचा माणूस आता स्थिरावताना दिसत आहे. दशकापूर्वीची शेती अवजारे आणि सध्याची अवजारे, खते, औषधे आणि बी-बियाणे आदींच्या वापरातील फरक कृषी क्षेत्रातील समृद्धता वाढत असल्याचे दर्शवतो. केवळ लोक आधुनिक शेतीच करू लागले असे नाही, तर नगदी पिके घेण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे. केवळ ऊस हे पीक घेणारा शेतकरी आता स्ट्रॉबेरी, चहा ही पिके घेण्याबरोबरच फुलशेती, फळशेती आदी उत्पादनाकडे वळला आहे.

पुणे, बेंगलोरनंतर आता कोल्हापूरकडे आयटी डेस्टिनेशन म्हणून पाहिले जात आहे. गेल्या दशकाच्या प्रारंभीचे औद्योगिक कोल्हापूर आणि सध्याचे कोल्हापूर यामध्ये औद्योगिक क्षेत्रात साधारणत: दुपटीने वाढ झाल्याचे आशादायी चित्र आहे. देश-विदेशांत इथल्या उद्योजकांनी आपल्या मालाची निर्यात केली आहे. शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर, पांजरपोळ, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी आणि आता पंचतारांकित औद्योगिक वसाहत याचबरोबर तालुक्यातील छोटय़ा-मोठय़ा औद्योगिक वसाहती, इचलकरंजी वस्त्रनगरी, हुपरी चंदेरी नगरी यामधून उद्योगांची मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे वास्तव आहे.

कोल्हापुरात यापूर्वी एखादा जनता बझार वा ग्राहक बझार असायचा. आता कोल्हापूरला मॉल संस्कृती आली आहे. टाटासारख्या सुप्रसिद्ध कं पनीने आपला मॉल सुरू केल्याने व्यापारात वाढ झाल्याचे हे सुचिन्ह आहे. धान्य व्यापार, गूळ व्यापार आदी सर्वच क्षेत्रातील व्यापारात आता कमालीची वाढ झाली आहे. सेवा व्यवसायातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने सर्व प्रकारच्या सेवा पुरवणार्‍या निमशासकीय आणि खासगी अशा अनेक संस्था कार्यरत आहेत. बँकिंग क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दशकांपूर्वी पतसंस्था वा सहकारी बँका असे चित्र असणार्‍या जिल्ह्यात आता खासगी बँकांनी प्रवेश करून आपले स्थान अधिक बळकट केले आहे. विदेशी बँकांचे आगमनही मोठय़ा प्रमाणात कोल्हापुरात झाले आहे. आधुनिकतेचा वापर करताना ग्राहकांना खूश करण्यासाठी बँकांमध्ये कमालीची स्पर्धा लागली आहे. एटीएम, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन सेवा आणि कोअर बँक प्रणालीसह अद्ययावत तंत्रज्ञान वापरणार्‍या बँकांचे कोल्हापुरातील वाढणारे प्रमाणही सुखावह असेच आहे. सोन्या-चांदीची मोठय़ा प्रमाणात उलाढाल असणारा हा जिल्हा पेढय़ांशी नाते सांगत होता. आता मात्र सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोठमोठय़ा शोरूम कोल्हापूरचे वैभव वाढवत आहेत. कुरिअर सेवा, विमानासाठी आवश्यक असणारी व्हिसा, पासपोर्ट सेवा या बरोबरच कोल्हापूरच्या पर्यटनात कमालीची वाढ झाली आहे. टूर्स अँंड टॅव्हल्सचा मोठा व्यवसाय आता कोल्हापुरात आपले पाय घट्ट रोवत आहे. कोल्हापूर सिटी आता मेडिकल हब आणि एज्युकेशनल हब म्हणून विकसित होत आहे. मोठमोठे दवाखाने आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांची सुविधा आता कोल्हापुरात निर्माण झाली आहे. अद्ययावत शिक्षण व्यवस्था हेही कोल्हापूरचे वेगळे वैशिष्टय़ बनत आहे.