सौजन्य -  दै. लोकमत

गरमागरम चहासोबत ब्रेड, बटर, बिस्किट आणि खारी असे बेकरीतून आणलेल्या खाद्यपदार्थांनी प्रत्येकाची सकाळ उजाडते. गरीब असो, मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत प्रत्येकाची ‘चाय पे चर्चा’ या बेकरीतून आणलेल्या खाद्यपदार्थांमुळेच रंगते. 

श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी जरी बेकरी उद्योग सुरू झाले असले तरी गरिबांच्या पोटाची आग विझविण्यातही या उद्योगाचा हातभार आहे, हे वास्तव आहे. आजही केवळ पाव खाऊन पोट भरणारे इथे आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्यात केवळ वडापाव किंवा चहापाव खाऊन प्रगती करणाºयांची अनेक उदाहरणे आहेत. ब्रेड, बटर बनविणारे आणि ते योग्य दरात गरिबांचा जठराग्नी काही प्रमाणात का होईना शांत करणाºया या बेकरी उद्योगात कोल्हापूरचा वाटाही खारीचा आहे.
कोल्हापूर खवय्येगिरीचे माहेरघर. इथे प्रत्येक खाद्यपदार्थाचा सन्मान होतोच. खास कोल्हापुरी वडा असो की बॉम्बेवडा, कोल्हापूरी मिसळ, कटवडा असो की केवळ पाववडा, पावभाजी असो की सॅन्डविच ब्रेड, सोबत पाव हा लागणारच. त्यामुळे रोज उठल्यावर इथल्या खवय्याला नुसत्या चहा घेणे मानवतच नाही. त्याला पाव, खारी, बिस्किटे पाहिजेतच. इथले पावही वैविध्यपूर्ण. मिसळ, कटवडा खायचा असेल, तर त्याला लादी पावच हवा. 
हिंदुस्थान, खेमराज, ज्योतिर्लिंग, गणेश, माधुरी, भारत, चंद्रकांत या बेकरीत साधा आणि मिल्क ब्रेडसाठी रांगा लागतात. ताराबाई रोडवरील हिंदुस्थान बेकरीचा कारभार महिलाच पाहतात. केदारलिंग बेकरीमधील बरेचसे कामगार हे गरजूच आहेत. सॅन्डविचचा ब्रेड वेगळा, बॉम्बेवड्यासाठीचा ब्रेडही वेगळा. सॅन्डविच ब्रेड, ब्राउन ब्रेड, गार्लिक ब्रेड, असे अन्य ब्रेडचे प्रकार पाहून तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल.
इथल्या खारीचा स्वादही वेगळा. त्यातही वेगवेगळ्या व्हरायटी. मेथी खारी, ३२ पापुद्य्रांची खारी, तिखट खारी, अशा एक ना अनेक व्हरायटी. बिस्किटांमध्येही विविधता. उपवासासाठीही वेगळी बिस्किटे इथे तयार होतात. कोल्हापूरची खासियत म्हणजे वर्की. हा प्रकार आता दुर्मीळ. जिरं, चेरी घातलेले बटर आज बाजारात मिळतात; पण त्यांची चव पूर्वीच्या वर्कीला नाही. घडीच्या वर्क्याही आता बंद झाल्या आहेत. पिळाची वर्की (बॉबी वर्की) खूप प्रसिद्ध. 
खवय्यांची ही नेमकी गरज ओळखून कोल्हापुरात बेकरी उद्योगाचा प्रारंभ झाला. नेमके कोणत्या वर्षी हा उद्योग इथे सुरू झाला ते सांगणे कठीण असले तरी दाभोळकर कॉर्नर परिसरात पूर्वी दानिश बेकरी असल्याचे काही जाणकार सांगतात. याच बेकरीत काम करून पाव बनविण्याचे तंत्र एका बेळगावच्या बेकरकडून इथल्या कामगारांनी शिकून घेतले आणि हळूहळू हा उद्योग शहरात सुरू झाला. ज्या कोल्हापूरचा इतिहास ब्रह्मपुरीशी जोडला जातो, त्याच ब्रह्मपुरीत बेकरीचाही इतिहास जोडला गेला आहे. हा परिसर म्हणजे पाव बनविणाºयांची पंढरी मानली जाते. आजही येथे पाव बनविण्याच्या भट्ट्या आहेत.
१९४२ च्या काळात कोल्हापुरात हाताच्या बोटांवर मोजता येणाºया पाच ते सहाच बेकºया होत्या. नागेश, शंकरराव व हरिभाऊ कित्तूर यांनी कमला कॉलेजजवळ सुरू केलेली बेकरी कोल्हापुरातील पहिली बेकरी मानली जाते. आज तिचे अस्तित्व नसले तरी त्या बेकरीत काम केल्याची आठवण ८४ वर्षांचे विष्णुभाऊ खाडे सांगतात. याशिवाय महालक्ष्मी, मॉडर्न, रामचंद्र, प्रवीण, विजय, मिलन, खेमराज, गजानन बेकरी या प्रसिद्ध बेकºया कोल्हापुरात प्रसिद्ध.
नारायणराव पठाडे, बाबूराव काशीद, सुखदेव खुडे, गोविंदराव मुळे, शंकरराव मुळे, श्यामराव मुळे, दिनकरराव चव्हाण, शेख हुसेन शिकलगार, दौलू चेचर, बळवंतराव लुगटे, यशवंतराव देसाई, दत्तोबा कुशप्पा खाडे, दत्तात्रय जगताप, इस्माईल इंगळीकर, विनायकराव क्षीरसागर, जयसिंगराव राऊत, महंमद शेख, बाजीराव भोपळे, गणपती इंदुलकर, हेमंतराव कंग्राळकर-देसाई, बाबूराव जाधव, बाळकृष्ण गवळी, अल्लाबक्ष शेख, रामचंद्र पाटील, साळोखे, माळी यांच्याही जुन्या बेकºया. या बेकºयांमध्ये ब्रेडपेक्षा वर्की, बटरलाच जास्त मागणी असायची. 
ब्रेड म्हणजे मध्यमवर्गीयांचे खाणे होते. ब्रेड तयार करण्याच्या पद्धतीबद्दल नेहमी शंका घेतली जाई; परंतु कोल्हापुरातील बेकरी व्यावसायिकांनी फार कष्टातून पाव लोकप्रिय केला. 
आज बेकरी उद्योग नावारूपास आला आहे. ६0 वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. बेकरी उद्योगापुढे अनेक अडचणी होत्या. १९६५ च्या दरम्यान देशात अन्नधान्याची टंचाई होती. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना आठवड्यातून एकदा जेवण करण्याचे आवाहन केले होते. तेव्हा गव्हाच्या किमती कडाडल्या होत्या. त्यामुळे मैद्याचे दरही भडकले होते. गरीब लोकांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. अशावेळी गरिबांना पावासारख्या पूरक अन्नाचा पुरवठा योग्य दरात करून एकप्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील बेकरी उद्योगाने आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण केली. 
मैद्याची टंचाई, दरातील वाढ, त्यावरील नियंत्रण, खुल्या बाजारातील अस्थैर्य अशी अनेक संकटे बेकरी उद्योगाने पचविली. साधारणत: खाणाºयांची संख्या जशी वाढत गेली, तशी बेकरींची संख्याही वाढत आहे. सध्या बेकरी व्यवसायात खूप तारेवरची कसरत झालेली आहे. बाजारात सर्व कच्च्या मालांचे दर साखर, मैदा, तेल, डालडा, ग्लुकोज, डिझेल, पॉलिथीन, आदी वस्तूंचे प्रत्येकवेळी दर वाढत आहेत. त्या प्रमाणात उत्पादित मालाच्या दरामध्ये वाढ होत नाही. त्यामुळे छोटे-मोठे बेकरी व्यावसायिक मोडकळीस येत आहेत. 
कोल्हापूर जिल्हा बेकर्स संस्थेकडे ३६५ बेकºयांची नोंद आहे; पण यातील २0 टक्के बेकºया आजघडीला बंद आहेत. रोज साधारणपणे १५00 किलो मैदा ब्रेड व इतर पदार्थांच्या वापरासाठी लागतो आहे. जिल्ह्यात रोज एकूण १.३० लाख ब्रेडची विक्री होते. 
 
दुस-या महायुद्धाचा हातभार
बेकरी व्यवसायाला दुस-या महायुद्धामुळे मोठा हातभार लागला. स्थलांतरित झालेल्या पोलिश लोकांची वसाहत पूर्वीच्या वळिवडे गावात म्हणजे आताच्या गांधीनगर येथे होती. १९४३ ते १९४८ या काळात त्यांचे येथे वास्तव्य होते. त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पावाची भट्टी सुरू करण्यात आली होती. जवळजवळ दहा हजार ब्रेड रोज तयार केले जात. तीस पोती मैदा तेव्हा लागे; परंतु कोल्हापुरातील कामगारांना या भट्टीत काम दिले जात नव्हते. बेळगावहून कामगार आणून त्यांच्याकडून पाव तयार केले जात. विष्णुभाऊंचे वडील पोलिस खात्यात होते. त्यांची बदली बेळगावजवळील गोकाक येथे झाली होती. तो संदर्भ देत विष्णुभाऊंनी या भट्टीत काम मिळविले. पाच वर्षांनंतर ही भट्टी बंद करण्यात आली. डबल पगार देऊन कामगारांची सुटी करण्यात आली. पुन्हा सर्व कामगार बेकार झाले. प्रसंगी हमाली करण्याची वेळ आली.
यानंतरच खाडे बंधूंनी मंझिल हकीम यांच्या प्रोत्साहनाने स्वत:ची भट्टी सुरू केली. जागाही त्यांचीच. अवघ्या चार रुपये भाड्यात भट्टी सुरू झाली. आजही ती भट्टी सुरू आहे. आजही ते जागामालकांना ७00 रुपये भाडे देतात. त्यावेळी हावळ, गोडबोले, हकीम असे काही नेहमीचे अधिकारी खाडे यांच्याकडून पाव विकत घेत.
 
या आहेत काही गाजलेल्या बेक-या...
 
केदारलिंग बेकरी
लाकडाच्या भट्टीत पाव भाजणे बंद झाले आहे. पीठ मळणे, पाव भाजणे यात अत्याधुनिक यंत्रांचा वापर सुरू झाला आहे. यात आघाडीवर होते, ते केदारलिंग बेकरीचे राजाराम खाडे. त्यांचे वडील दत्तोबा कुशाबा खाडे हे वयाच्या बाराव्या वर्षीच या व्यवसायात शिरले. त्यांनी १९५५ मध्ये किशाबापूंच्या प्रेरणेमुळे रंकाळवेश बसस्थानक परिसरात केदारलिंग बेकरीची स्थापना केली. वयाच्या पंधराव्या वर्षीच राजाराम खाडे यांनीही या व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी मंगल ओव्हनसारखी अत्याधुनिक यंत्रसामुग्री सर्वप्रथम या व्यवसायात आणली. पाऊणतासात २५0 ब्रेडची निर्मिती करण्याची या यंत्राची क्षमता आहे. शिवाय बिस्किटे, खारी, बटर, वर्की यांचे विक्रमी उत्पादन करण्याची क्षमताही त्यामध्ये आहे.  मुंबईच्या नॅशनल असोसिएशन आॅफ बेकरी इंडस्ट्रीजचे ते पहिले संचालक आहेत. त्यांच्या पत्नी प्रभावती, दोन मुले सत्यजित आणि सुशांत असे सारे कुटुंबच आज हा उद्योग सांभाळत आहे. उद्योगवाढीसाठी त्यांच्या दोन्ही मुलांनी चीनचा दौराही केला आहे. सत्यजित यांनी तयार केलेली खास उपवासाची बिस्किटे आणि चक्क उपवासाचा शाबूचा केक लोकप्रिय आहे.
 
जयभारत बेकर्स
विनायकराव क्षीरसागर म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांचे वडीलही बेकरी व्यावसायिक. १९७२ मध्ये जिल्हा परिषदेतील नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर १९५0 मध्ये त्यांनी बेकरी उद्योग सुरू केला. खासदार निंबाळकर यांच्या प्रेरणेने जयभारत बेकर्स या नावाने शनिवार पेठेत बेकरी सुरू केली. मातीच्या भट्टीत पाव तयार करण्याचे कष्टप्रद काम त्यांच्या कुटुंबीयांनी केले. त्याकाळी रोज सहा हजार वर्की ते तयार करीत. जास्तीतजास्त वर्क्या या ग्रामीण भागात जात. मलकापूर, बांबवडे, कोकण भागात बैलगाडीतून माल पोहोचविला जाई. १९९८ पर्यंत ही बेकरी चालविली. नंतर ती दुसºयाला चालवायला दिली. 
 
गोकुळ शिरगावातील ‘बाबूराव बेकरी’
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील ‘राज राजेश्वरी’ गोल्डन बेकरीचे उत्पादन ‘बाबूराव ब्रेड’ या नावाने बाजारात परिचित आहे.  १९४६ मध्ये बाबूराव रामाण्णा तांबे हे बंगलोरमध्ये (कर्नाटक) ‘बंगलोर विजय बेकरी’मध्ये कामास गेले. तेथे सलग १२ वर्षे काम करून परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर १९५८ मध्ये हुबळीमध्ये छोट्याशा भाड्याच्या जागेत बेकरी सुरू केली. पहिल्या दिवशी फक्त ५ किलो मैद्याचा माल तयार केला व स्वत: सायकलने विक्रीस गेले. त्या दिवशी माल विकला गेला नाही. परत बेकरीमध्ये आले. मनाला खंत वाटली; पण गप्प न बसता पूर्ण हॅन्डवर्क पद्धतीने कष्टाने माल तयार केला; पण तोही विकला गेला नाही; परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. दुसºया दिवशी ते माल विक्रीस घेऊन गेले. पाच किलोचा माल विकण्यासाठी त्यांना चार दिवस लागले. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. लोकांची मानसिकता बेकरी पदार्थ खाण्याची नव्हती. बाबूरावांनी जिद्दीने रात्रीचा दिवस करून हळूहळू सेल वाढविला. व्हरायटी वाढविली. दोन वर्षांत म्हणजे १९६० मध्ये त्यांनी प्रथम इंग्लंडमेड मिक्सर खरेदी केले. हळूहळू एक-एक मशिनरी वाढवू लागले. उत्पादन वाढविले. विक्री वाढविली. १९६२ मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर स्वत:ची जागा घेऊन व्यवसाय चालू केला. त्यांच्या मुलांनीही याच व्यवसायात प्रगती केली. वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी त्यांनी या बेकरीस ‘बंगलोर विजय’ ऐवजी ‘बाबूराव बेकरी’ नाव दिले. त्यानंतर ‘बाबूरावर्स’ या नावाने सर्व तयार उत्पादने बाजारात आली.  १९९२ मध्ये बाबूरावांचे निधन झाले. २००० मध्ये कोल्हापुरात गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सुरेश तांबे, अरुण तांबे, गोपाल तांबे या भावंडांनी ५० गुंठे जागेमध्ये व ६००० स्केअर फूट बांधकाम करून बेकरी व्यवसाय चालू केला. अनुभव व जिद्दीच्या जोरावर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विजापूर, बेळगाव या जिल्ह्यांमध्ये मार्केटिंग केले व ब्रेड, बटर, टोस्ट, खारी, डोनेट, केक, बनपाव, बर्थडे केक यामध्येही वेगवेगळ्यया क्वॉलिटीची भरपूर व्हरायटी आणली. मार्केटमध्ये विक्री वाढली. नमकीनमध्ये देखील फरसाणा, मक्का चिवडा, बुंदी, शेव चिवडा, लाडू अशा व्हरायटीज आहेत. बेकरीमध्ये मॅनेजमेंट सुपरवायझर कोणीही नसून, स्वत: तांबे बंधूच रात्रंदिवस कष्ट करून व्यवसाय चालवितात. 
 
नांदणीची गणेश बेकरी
नांदणी येथे आण्णासाहेब चकोते यांनी मोठ्या धाडसाने गणेश बेकरी सुरू केली. १९९१ साली चक्कीबरोबर सुरू केलेल्या बेकरीमध्ये चकोते यांनी प्रारंभी पावाचे उत्पादन केले. हे पाव चकोते स्वत: विविध दुकाने, हॉटेलमध्ये पोहोचवित होते. त्यांचे हे उत्पादन पोहोचविणे व खपविण्यातही मोठे कष्ट घ्यावे लागत होते. ५० हजार रुपयांच्या कर्जात सुरू केलेल्या या बेकरीने प्रत्येक टप्प्यावर आधुनिकता अंगीकारून नवीन उत्पादने सुरू केली. पावाबरोबरच बटर, बनपाव, खारी, टोस्ट, अशी विविध उत्पादने सुरू केली. १९९५ ते ९६ पासून ही उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सध्या राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये बेकरीची विविध उत्पादने पोहोचत आहेत. आता ५० कोटींवर उलाढाल पोहोचली आहे. 
 
हिंदुस्थान बेकरी
कोल्हापूर शहरातील अन्य नावाजलेल्या बेकरींबरोबरच शेख कुटुंबीयांची ‘हिंदुस्थान बेकरी’ ही कोल्हापुरातीील अगदी जुनी बेकरी म्हणून ओळखली जाते. याची स्थापना १९४८च्या सुमारास झाली. ताराबाई रोडवर असलेल्या या बेकरीमधील मिल्क बटर ही प्रसिद्ध होते. येथील बटर असो, ब्रेड असो वा इतर प्रकारची बिस्किटे असोत, खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरश: रांग लागलेली असायची. बेकरीचे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची रांग पाहायला मिळणारे हे कोल्हापूर शहरातील एकमेव ठिकाण होते. आता ही बेकरी नव्या युगाप्रमाणे आधुनिक बनली आहे. पूर्वीच्या ब्रेड, बटरबरोबर विविध प्रकारचे केक, पेस्ट्रीज, पप्ससारखे नव्या पिढीच्या आवडीचे पदार्थही बनवित आहे. 
 
खेमराज बेकरी
१९५२ मध्ये शांताराम बांदेकर यांनी शाहूपुरीत खेमराज बेकरीची स्थापना केली. पूर्वी ही बेकरी कोरगावकर कंपाऊंड येथे होती. कोल्हापूरकरांना लागणाºया विविध बेकरी पदार्थांचे उत्पादन येथे केले जात आहे. आता बांदेकरांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. पूर्वीपासून बटर, टोस्ट, ब्रेड ही उत्पादने घेतली जात असून, त्यात विविध बिस्किटे, खारी यांची भर पडली आहे. रोज ताजे उत्पादन ग्राहकांच्या हातात देतात. पूर्वी दुपारी तीननंतर हे पदार्थ मिळायचे; पण आता सकाळपासूनच ही उत्पादने शहराच्या विविध भागातील काऊंटर तसेच बेकरींमध्ये पोहोचविण्यात येतात. 
 
यळगूडची हनुमान बेकरी
१९६७ मध्ये यळगूड येथील श्री हनुमान दूध व्यावसायिक व कृषिपूरक संस्थेची स्थापना सहकारमहर्षी वसंतराव तात्यासाहेब मोहिते यांनी केली. संस्थेने १९७२ मध्ये बेकरी उत्पादने सुरू केली. मिरजेला दूध पुरवून शिल्लक राहिलेल्या दुधातून बेकरी उत्पादने करण्यास संस्थेने सुरुवात केली. त्यातूनच मिल्क ब्रेड ही संकल्पना नावारूपाला आणली. इतर ब्रेडच्या तुलनेत हा ब्रेड गोड असल्याने व त्यातील चेरींमुळे सहकार ब्रेडची प्रसिद्धी प्रचंड झाली. अजूनही मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या यळगूड शॉपीमधून मिल्क ब्रेड घेऊन पश्चिम महाराष्ट्रासह, बेळगाव, मुंबई, पुण्यात विक्री होते. रोज सहा हजारांवर ब्रेड निर्मिती होते. नानकटाई, बनपाव, केक, खारी, बटर तसेच इतर उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात. कार्यकारी संचालक सुजितसिंस्ह मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज संस्थेला अन्न सुरक्षा प्रणालीअंतर्गत ‘एफएसीसी २२,000’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. शिवाय सहकारमहर्षी आणि कृषिभूषण सारखे १५ ते २0 पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत.  
नवे तंत्र प्रथम आणणारी भारत बेकर्स
शहरातील जुनी बेकरी म्हणून ‘भारत बेकर्स’ची ओळख आहे. १९४२ मध्ये हेमंतराव कंग्राळकर-देसाई यांनी बिंदू चौकात ही बेकरी सुरू केली. सध्या उद्यमनगरातील बेकरीमध्ये दुसºया पिढीचे प्रतिनिधित्व करणारे जयसिंह कंग्राळकर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले. ७० वर्षे झालेल्या या बेकरीने प्रथमच शहरात वेष्टनातील ब्रेड बाजारात आणले. साधा ब्रेड लाल, तर मिल्क ब्रेड निळ्या रंगाच्या प्लास्टिक वेष्टनात बाजारात आणले. पूर्वी कागदाच्या वेष्टनात होता. आता प्लास्टिक वेष्टनात आहे. या रंगावरून ब्रेड भारत बेकरीचा आहे हे ग्राहक समजत होते. आता ब्रेड, एगलेस केक, फ्लेवर्ड बिस्किटसह खारी तसेच विविध पदार्थांचे वितरण शहराच्या विविध भागांतील ११ शॉपीमधून केले जात आहे. जयसिंग यांचा मुलगा विश्वजित याने पुण्यात फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमधून बेकर्स अँड कन्फेशनर्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथे २0१४ मध्ये २१ फूट लांबीचा केक तयार केल्याने त्याची ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्डस्’मध्ये नोंद झाली आहे. कंग्राळकर देसार्इंचे चारही बंधू या व्यवसायात आहेत. तांत्रिक कारणामुळे भारत बेकरी आणि भारत बेकर्स असे त्यांची विभागणी झाली आहे. दौलतराव बाळासाहेब देसाई, बालकुमार, शिवाजीराव आणि हेमंतराव हे या व्यवसायात होते. भारत बेकरीची सूत्रे सध्या मुकूट शिवाजीराव कंग्राळकर देसाई सांभाळत आहेत. त्यांनी परदेशातील डोनेट सर्वप्रथम १९८0 मध्ये कोल्हापुरात आणले. याशिवाय पेस्ट्री, डॅनिश पेस्ट्रीही त्यांनी प्रथमच आणली.
 
माधुरी बेकरी
ग्राहकांशी गोड बोलून त्यांचे स्वागत करणा-या वडगावकर बंधूंची माधुरी बेकरीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. येथील खमंग आणि दर्जेदार पदार्थांपासून पहाटेपासूनच लोकांची गर्दी होते. बिंदू चौकातील ही बेकरी एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये १९६६ मध्ये सुरू झाली. स्वातंत्रसैनिक अनंतराव वडगावकर यांच्या संस्काराखाली शशिकांत, चंद्रकांत, रवींद्र, सूर्यकांत आणि रतिकांत यांनी कष्टातून हा बेकरी व्यवसाय फुलविला. येथे स्वतंत्र केक शॉप, पंधरा मिनिटांत ७0 प्रकारचे फ्रेश केक येथे मिळतात. नूडल्सचा चायनीज समोसा, कोल्हापुरी कंदी पेढे, भडंग, खोबरे बिस्किट, डाएट चिवडा, खारी, जिराबटर, स्वीट टोस्ट, केक टोस्ट, असे पदार्थ येथे मिळतात. काजूकतलीसह उपवासाच्या पॅटीससाठी माधुरी बेकरी प्रसिद्ध आहे. 
 
खाडे बंधूंच्या भट्ट्या
ब्रह्मपुरी परिसरातील नाक्यावरील मुळे यांच्या बेकरीत हे विष्णुभाऊ काम करीत होते. मुळे यांच्या दोन भट्ट्या होत्या. प्रकृती अस्वास्थामुळे तसेच काही कारणांमुळे मुळे यांनी ही पावाची भट्टी खाडे बंधूंना चालविण्यास दिली. थोरले दत्तूभाऊ, मधले विष्णुभाऊ आणि धाकटे बाळूभाऊ खाडे हे तिघेही या उद्योगात भट्टीसमोर काम करू लागले. दोघे भट्टी सांभाळायचे, तर एकजण सायकलवरून पाव विकण्याचे काम करू लागला. महिन्याला दोन रुपये पगार मिळत असे. दुसरे महायुद्ध सुरू असताना सरकारने मैद्यावर नियंत्रण आणले. त्याचा बेकरी व्यवसायावर प्रचंड परिणाम झाला. मैद्यासाठी परमिट लागे. अनेक ठिकाणचा मैदा छापा घालून जप्तही करण्यात आला. त्यामुळे सामान्य बेकरी व्यावसायिक अन्नाला महाग झाला. या साºया प्रकारामुळे विष्णुभाऊंसारखे अनेक कामगार बेकार झाले.