महाराष्ट्राचा इतिहास सांगणारं वैभव संपन्न शहर, कलावंतांचं कलापूर, दक्षिणकाशी पंचगंगा म्हणजे तीर्थस्थान, शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालविणारं राजर्षीचं कोल्हापूर म्हणून अभिमानाने कोल्हापूर शहराचा गौरव होतो. सन १८९४ ला शाहू महाराजांच्या रुपाने कोल्हापूरला एक कर्तबगार, प्रजाहितदक्ष, दूरदर्शी व सर्वसामान्य जनतेच्या सुख दु:खाशी समरस होणारा राजा लाभला. त्यांनी प्रजेला व शहराला नवा दृष्टिकोन प्राप्त करुन दिला. याचं सारं श्रेय शाहू महाराजांना आहे.

महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून जसं कोल्हापूर मनामनांत रुजल आहे, तसं विविध कलाक्षेत्रातील अभिजात कलावंतांची मांदियाळी म्हणून अजरामर आहे. कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा सुरेख संगम आहे. पश्चिमेला रंकाळा तलाव, उत्तरेश्वर मंदीर आणि कुस्त्यांचे प्रसिध्द खासबाग मैदान आहे. या मैदानात ६० हजार प्रेक्षक बसू शकतात. श्वेताबंर जैनांच्या मुनिसूक्त मंदिरातील नक्षीकाम अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे पंचगंगा घाट, जैनमठ इ. प्रेक्षणीय स्थळंही आहेत. साखर कारखाना, छत्रपती शाहू मार्केट, टेंबलाई टेकडीवरील टेंबलाई देवीचं देऊळ, शिवाजी विद्यापीठ , शिवाजी उद्यमनगर, वस्तूसंग्रहालय, चंद्रकांत मांडरे यांचे कलादालन हेही पाहण्यासारखं आहे. तेथील औद्योगिक वसाहतही पाहण्यासारखी आहे.
जवळची प्रेक्षणीय स्थळे - पन्हाळागड १८ कि.मी., विशाळगड ८८ कि. मी., ज्योतिबाचा डोंगर १२ कि. मी. , बाहुबली जैन धार्मिक क्षेत्र, कण्हेरी, सिद्धिगिरी मठ, दत्तस्थान नरसोबाची वाडी, खिद्रापूर येथील शंकराचे मंदीर, कोणार्कच्या सूर्यमंदिराइतकंच भव्य आहे. तसंच संत मौनी महाराजांचा मठ व ग्रामीण विद्यापीठ, मौनी विद्यापीठ, राधानगरी तलाव व धरण, दाजीपूर अभयारण्य व किल्ला पाहण्यासारखं आहे.

करवीर रसिकांनी लोकाश्रय व राजर्षिंनी राजश्रय दिल्याने कोल्हापुरी कुस्त्यांचं नाव दिगंतात पोहेचलं. आजही ही वैभवशाली परपंरा जोपासली आहे. खासबाग शाहू मैदानाने भवानी मंडपातून काही अंतरावर हे मैदान असून चाळीस ते साठ हजार कुस्तीशौकीन बसतील एवढी याची क्षमता आहे. कोल्हापूरच्या पूर्वेस बगल मारुन देवी त्र्यंबोलीचं मंदीर आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे. त्र्यंबोली दर्शनास गेल्यास रात्रीच्या वेळी करवीर नगरीचं दर्शन म्हणजे तारे कुशीत घेतल्याप्रमाणे विलोभनीय दिसतं.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेत भर घालणाऱ्या सुप्रसिध्द दसरा चौक आपल्या आगळयावेगळया वैभवाचं जतन करत आहे. चौकामध्ये शाहू महाराजांचा पुतळा असून, विजयादशमीला शिलंगणाचा कार्यक्रम शाही इतमानाने साजरा होतो.

कोल्हापूरच्या नगरीत आधुनिक ज्ञानाची द्वारं खुलं करणारे शिवाजी विद्यापीठ असून ते छत्रपतींच्या पुण्याईने साकारलेलं आहे. विद्यापीठ आवारात विराजमान झालेला शिवाजी महाराजांचा पुतळा असून सभोवताली सुंदर बाग आहे. प्रेरणादायी व उत्साही वातावरणात ज्ञानपिपासूंना अविरतपणे ज्ञान संपादन करता येतं.
कोल्हापुरी माणूस जसा कलासक्त तसाच पट्टीचा खवय्याही आहे. कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी रस्सा, मटण, कोल्हापुरी भेळ, लोणची, मासांहार, आईस्क्रिम, कट्ट्यावरील धारोष्ण दूध यांचा आस्वाद आजही जिभेवर रेंगाळत असतो