कुस्ती

विविध क्षेत्रांत अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूरची क्रीडा परंपरा अतिशय उल्लेखनीय आहे. कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूर साऱ्या भारतात प्रसिध्द आहे. पुरातन काळापासून चालत आलेली एक विद्या म्हणजे मल्लविद्या! `यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी मल्लविद्या जोपासण्याचे कार्य करवीर नगरीत केलं! तळमळीनं केलं! आत्मीयतेनं केलं! भीमकाय, निरोगी शरीरयष्टी शाहू महाराजांना निसर्गत:च लाभली होती. स्वत:प्रमाणे आपली प्रजाही बलदंड व निरोगी शरीराची व्हावी म्हणून राजर्षींनी कोल्हापूरात अनेक तालमींची निर्मिती केली.
या तालमीतून पैलवानांच्या राहण्याची आणि दैनंदिन खुराकाची महाराजांनी व्यवस्था केली. पैलवानांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक नामवंत वस्तादांची नेमणूक केली. साहित्य पुरविले आणि बघता बघता राज्याच्या आश्रयाखालील या तालमीत शड्डूचे आवाज घुमू लागले. तरुण पैलवानांची शरीर आकारु लागली. कोल्हापूरच्या विविध भागातील तालमीत व्यायाम घेऊन बलदंड शरीराचे पैलवान निर्माण होऊ लागले.
प्रत्येक तालमीत तयार होणाऱ्या पैलवानांच्यात ईर्षा, स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कुस्त्यांची मैदाने महाराजांच्या मार्गदर्शनाखाली भरु लागली. स्पर्धेशिवाय प्रगती होत नाही हे त्यामागचे सूत्र होते. सुरुवातीची मैदाने मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी बाबूजमाल दर्गा आणि मंगळवार पेठेतील शिवाजी थिएटरच्या प्रांगणात भरत. शिवाय महत्त्वाच्या सणासुदीलाही कुस्त्यांची मैदाने भरविली जात. नव्या राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सभोवती कनात लावून मैदाने होत. ही सारी मोफत असल्याने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होई! कुस्त्यांच्या मैदानांचे हे लोण अल्पावधीतच खेडोपाडी पोहोचले. मैदान भरविताना होणाऱ्या गैरसोयी महाराजांना जाणवत होत्या.
जेव्हा महाराज १९०२साली विलायतेला गेले तेव्हा त्यांनी रोमला भेट दिली. तिथली ऑलिंपिक नगरी आणि ओपन एअर थिएटर नजरेसमोरुन घातले. महाराजांचे विचार चक्र सुरु झाले. कोल्हापूरला येताच लाखभर प्रेक्षकांसाठी कुस्त्यांचे मैदान बांधण्याचे ठरले. आणि १९१२ साली खासबाग मैदानाच्या बांधकामाला सुरवात झाली. साठ फूट व्यासाचा व जमिनीपासून २ ।। फूट उंच असणारा आखाडा, प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, प्रवेशासाठी चारी बाजूला व्दार, नैसर्गिक लाभलेली उतरणी यामुळे कोल्हापूरचे खासबाग मैदान म्हणजे आशिया खंडात शोधून सापडणार नाही असे एकमेव मैदान. पुढे राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान या नावाने ओळखलं जाणारे! हजारो कामगार सहा वर्षे राबत होते.
अशा या मैदानाचे उद्घाटन अफलातून कुस्तीने झाले. कुस्ती होती गामा पैलवानचा भाऊ इमामबक्ष व गुलाब मोहिद्दीन यांच्यात. ही चित्तथरारक लढत इमामबक्षने जिंकली. कुस्ती शौकिनांनी फेटे उडवून दाद दिली.
राजर्षींनी जोपासलेली ही कुस्ती परंपरा छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे सुरु ठेवण्याचे काम मनापासून केले.
या मैदानात राजर्षीच्या काळापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपावेतो गामा-गुंगपासून युवराज सत्पाल अशा अनेक नामवंत मल्लांच्या लढती झाल्या. पंजाबातून आलेल्या मल्लाच्यावर इथल्या कुस्तीगिरांनी मात केली. श्रीपत चव्हाण, मल्लाप्पा तडाखे, शिवगौंडा मुत्नाळे, शामराव मुळीक, श्रीपती खंचनाळे, श्रीरंग जाधव, गणपतराव आंदळकर, महमंद हनीफ, दादू चौगुले, गणपत खेडकर, हरिश्चंद्र बिराजदार, युवराज पाटील इ. अनेकांची नावे घेता येतील.
ऑलिपिंक किंवा आतंरराष्ट्नीय स्तरावरील कुस्तीत कोल्हापूरच्या मल्लांनी महाराष्ट्न्चे व देशाचे नाव उज्ज्वल केले. ज्यात दिनकरराव शिंदे, बी. टी. भोसले, ब्रॉन्झपदक विजेते खाशाबा जाधव, माणगावे मास्तर यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. आशियायी कुस्ती स्पर्धातून कोल्हापूरच्या अनेक मल्लांनी सुवर्णपदके मिळविली. विष्णू जोशीलकर सारखे अनेक तरुण कुस्तीपटू निर्माण झाले. १ मे १९७९ रोजी खासबाग मैदान कोल्हापूर महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आल्यानंतर बऱ्याच सुधारणा झाल्या.
सध्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्नीय तालीम संघ, शिवाजी विद्यापीठ आणि निरनिराळया तालमी ही परपंरा जोपासण्याचे कार्य करीत आहेत. जुन्या नामवंत मल्लांचे नव्या मल्लांना मार्गदर्शन मिळत आहे.