जुना राजवाडा :



शहराच्या मध्यवस्तीत व महालक्ष्मी देवालयाच्या सान्निध्यात असलेला हा राजवाडा सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधला गेला. त्यानंतर अनेकवेळा त्यात सुधारणा केल्या गेल्या. सन १८१३ मध्ये त्याचा काही भाग पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याचा पुढील भाग तर संपूर्णपणे बऱ्याच कालातंराने बांधला गेला आहे. हा राजवाडा दुमजली असून मध्यभागी मोठा हॉल आहे. येथे श्री. महालक्ष्मी (तुळजा भवानी) च्या प्रतिमेची स्थापना केली आहे. या हॉलचा उपयोग दरबारगृह व खाजगी धार्मिक विधीकरता होत असे. राजवाड्याखेरीज इतर विस्तारित भागांचा उपयोग संस्थान काळात निरनिराळया संस्थानी कार्यालयासाठी म्हणून होत असे. सध्या या विस्तारित इमारती पोलिस स्टेशन, कोर्ट, एन. सी. सी. ऑफीस शेतकरी बझार, राजाराम हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल वगैरे करिता वापरल्या जातात. राजवाड्यासमोर एक मोठा मंडप असून त्याला भवानी मंडप असे म्हणतात. भवानी मंडप हे सध्या सिटी बसेसचे एक केंद्र आहे. या राजवाड्याच्या उत्तरेला जुन्या पध्दतीची पाच मजली वास्तू आहे. याचा वापर नगारखान्याच्या वास्तूला तीन मोठ्या कमानी आहेत. मधल्या हॉलमध्ये जो पूर्वी दरबारी थाट होता तो अलिकडच्या काही वर्षात पहावयास मिळत नाही व इथून पुढे मिळणारही नाही. सध्या तेथे एक गवा रेडा आणि वाघ, सांबर आदि कांही प्राणी भुसा करुन उभे केलेले आहेत. रान- रेडा सध्याच्या छत्रपतींनी सुमारे ३० - ३५ वर्षापूर्वी मारला होता. ही एकच काय ती निशाणी राहिलेली आहे. बाकीचा सर्व वैभवी थाट लोप पावलेला आहे.
भवानी मंडपाला ऐतिहासिक संदर्भ आहे. जगात फार थोड्या ठिकाणी भवानी मंडपासारखा चौक आहे. अशा पुरातन वास्तूला व्यापाराने, बाजाराने, वाहनाने आज सतत घेरलेले असते. येथील भवानी मंडप अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे.
धार्मिक स्थळ, ऐतिहासिक संदर्भ व पुरातन वास्तू अशा अंगाने भवानी मंडपाचे आस्तित्व जतन करायला हवे. प्राचीन वास्तुसंस्कृती जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या `हेरिटेज' या आंतरराष्ट्नीय संस्थेने सुंदर चौक म्हणून नोंद घेतलेल्या या परिसराचे मूळ सौंदर्य हरवले आहे. व्यापारी परिसराचे व वाहनतळाचे स्वरुप आले आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचे महत्वाचे केंद्र म्हणूनही या परिसराची नवी ओळख रुजू लागली आहे. प्रशस्त चौक, दोन कमानीत झुलणारे दोन हत्ती, भवानीचे देऊळ व कोल्हापूर संस्थान प्रमुखांचे निवासस्थान असे मूळ स्वरूप असलेल्या या परिसरात आता अमूलाग्र बदल झालेला आहे. सिटी बस विभागाचा महत्वाचा थांबा असल्यामुळे बसची ये-जा, शासकीय कामासाठी, खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची थांबलेली वाहने, शाळांमुळे विशिष्ट वेळेत मुलांची होणारी गर्दी इत्यादी विविध कारणामुळे हा परिसर गर्दीने सतत वाहत असतो. या परिसरातील के. एम्. टी. बस स्टॉप खासबागजवळ हलवला तर या स्थळाच्या मूळच्या सौंदर्याचा पर्यटकांना आस्वाद घेता येईल.
भवानी मंडपाचा परिसर विलोभनीय दिसावा म्हणून जुन्या राजवाड्याच्या कमानीवर प्रकाशझोत टाकण्याची महाराष्ट्न् पर्यटन विकास महामंडळाची योजना होती. पण ती जाहीर झाल्यानंतर पुढील कोणतीही हालचाल झालेली नाही. उलट कमानीच्या आतील भागात काही लोकांनी आपला निवारा केला. विक्रेत्यांनी साहित्य ठेवण्यासाठी या जागेचा वापर सुरु केला आहे. भवानी मंडपाची ही स्थिती बदलण्यासाठी तातडीने हालचाल न झाल्यास अतिक्रमणाचा विळखा अधिकच घट्ट होईल. अशी स्थिती आहे. अलिकडे भवानी मंडपाच्या कमानीबाहेरील खाद्यपेयांचे स्टॉल मात्र हलवण्यात आले आहेत.