किल्ले भुदरगड

भुदरगड हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरच्या दक्षिणेस ३६ मैलावर व गारगोटीपासून ५ मैलावर सह्याद्रीच्या ऐन मध्यावरील उभट खडकावर विराजमान झाला आहे. प्रलयंकर शंकराच्या जटेत चंद्रकोर शोभावी तसा! याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट असून रूंदी २१०० फूट आहे. या किल्ल्यावर श्री केदारलिंग, भैरवनाथ, जखूबाई अशी देवस्थाने आहेत. बऱ्याच काळापर्यंत भुदरगड तालुक्याचा सगळा मुलकी व्यवहार या भुदरगडावरून पाहिला जात होता. अगदी अलिकडे शासकीय यंत्रणेच्या सोयीसाठी मामलेदार कार्यालय गारगोटीला स्थलांतरीत करण्यात आले.
महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) याने इ. स. ११८७ मध्ये शिलाहार राजघराण्याची राजधानी वाळव्याहून पन्हाळयास आणली. या राजा भोजने दक्षिण महाराष्ट्नत जे किल्ले निर्माण केले, त्यात हा एक भुदरगड असावा. शिलाहार राजवंशाचा अस्त होऊन यादवांची सर्वार्थाने वैभवशाली, सुसंस्कृत राजवंशातील महापराक्रमी राजा सिंघण याने इ. स. १२०९ मध्ये करवीर प्रांतावर आपला अंमल प्रस्थापित केला.

गडावरील भैरवाच्या देवालयासमोर एक दीपमाला आहे. तिच्यानजीक एक तोफ इतिहासाची साक्षीदार म्हणून राहिली आहे. गडावर दोन प्रचंड तलाव आहेत