सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

मौनी महाराजांचे पाटगाव-1 भुदरगड तालुक्यातील गारगोटी या तालुका मुख्यालयापासून 34 कि.मी. तसेच कोल्हापुरपासून 84 कि.मी. अंतरावर असलेले पाटगाव छत्रपती शिवरायांचे गुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौनी महाराजांच्या समाधीस्थानामुळे प्रसिद्ध आहे. ब्राह्मण धर्मगुरूंकडून होणारी बहुजन समाजाची धार्मिक आणि आर्थिक पिळवणूक कायमची थांबवण्यासाठी शाहू छत्रपतींनी मौनी महाराजांच्या गादीवर 1920 साली सत्यशोधक विचारांचा अभ्यासक असणार्‍या सदाशिव लक्ष्मण पाटील-बेनाडीकर या तरूणाची मराठय़ांचा 'छात्र जगदगुरू' म्हणून नेमणूक केली होती. मौनी महाराजंची समाधी असलेल्या मठाची इमारत भव्य असून नगारखाना असलेल्या महाद्वाराच्या आतील बाजूस भव्य सभामंडप आहे. मंडपात संपूर्ण दगडी फरशी असून मोठे लाकडी खांब आहेत. समाधीच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून तेथील खांबावर कोरीव काम केलेले आहे.मौनी महाराजांच्या समाधीच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल असून तेथील खांबावर कोरीव काम केलेले आहे. मौनी महाराजांची समाधी व मंदिराचे सर्व बांधकाम दगडी आहे. समाधी समोरील कोनाडय़ात मौनी महाराजांची उत्सवमूर्ती असून ती चंदन उगाळून बनवलेली आहे. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी निघताना येथे येवून मौनी महाराजांची गुरुकृपा-संपादन केली होती. त्यांच्या भेटीच्या ठिकाणी स्मारक उभारलेले आहे. जवळच मौनी महाराजांचे प्रथम शिष्य तुर्तागिरीची जिवंत समाधी आहे. मौनी महाराजांनी आयुष्यभर मौनव्रत धारण केले होते. मठात प्रतिवर्षी श्रवणात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत व माघ महिन्यात रथसप्तमीपासून त्रयोदशीपर्यंत दोन उत्सव साजरे केले जातात. गावात यादवकालीन भद्रकालीचे मंदिर असून या मंदिरातच करवीर संस्थापिका ताराबाई आणि पहिला छत्रपती शाहू यांचा समेट झाला होता. गावात शिवलिंग, दत्तात्रय, शंकर आदी अन्य मंदिरे आहेत. वेदगंगा नदीमुळे पाटगावचे दोन भाग झाले आहेत.