सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

पट्टणकोडोली व वाशीच्या प्रसिध्द बिरदेव यात्रा-1 धनगरांचे कोल्हापूरपासून 10 कि.मी. अंतरावरील बिरदेव देवस्थान पश्चिम महाराष्ट्रातील बिरदेवाचे सर्वात मोठे मंदिर म्हणून प्रसिध्द आहे. या बिरदेवाच्या यात्रेस खूप मोठी गर्दी जमते. बिरदेवाच्या पालखी मिरवणुकीत सारा परिसर भंडार्‍याने रंगून जातो. या यात्रेतील फरांडेबाबांची भाकणूक अत्यंत प्रसिध्द आहे. येथील धनगर जमातीची ही यात्रा मात्र पूर्ण शाकाहारी असते. येथे पुरण पोळीचा नैवेद्य लागतो. जिल्ह्यातील कोल्हापूरपासून 6 कि.मी. अंतरावरील वाशी येथील बिरदेवाची यात्रा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार्‍या या यात्रेस राज्यातून मोठय़ा संख्येने धनगर लोक जमतात. त्यावेळी बिरोबासमोर हजारो बकर्‍यांचे बळी देतात. वाशी येथील धनगरी नृत्याच्या पथकांनी राज्य व देशपातळीवर नाव कमावले आहे. येथील घोंगडीही प्रसिध्द आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात धनगर समाज लक्षणीय असून त्यांच्या 22 पोटजाती आहेत. त्यापैकी मेंढय़ांचे कळप बाळगणारे आणि बकर्‍या, मेंढय़ा व लोकर विकणारे मेंढे धनगर आणि सह्याद्रीच्या डोंगराळ भागात राहणारे व गुरे चारणारे, गुरांचा व्यापार करणारे डांगे धनगर या दोन पोटजाती प्रमुख आहेत. डांगे धनगरांना औषधी वनस्पतींची चांगली माहिती असते. डोक्याला सर्वसाधारण रंगीत पागोटे, खांद्यावर घोंगडी, काखेत पिशवी, अंगाज जाड कापडाचा कुडता, पायात करकर वाजणारे धनगरी पायताण, कमरेस लंगोटी व हातात जाड काठी अशी वैशिष्टपूर्ण वेषभूषा असणारी ही कष्टाळू, काटक व अतिथ्यशील जमात. हातात चांदीचे कडे, कानात सोन्याची बाळी असते. स्त्रिया व मुलांच्या अंगावर चांदीचे बरेच दागिने असतात. या धनगर जमातीचे आराध्य दैवत म्हणजे बिरदेव.