सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

कैलासगडची स्वारी शिवालय
केशवराव भोसले नाटय़गृहाजवळील कैलासगडची स्वारी हे शिवमंदीर दक्षिण काशी कोल्हापूर येथील एक जागृत व भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून प्रसिध्द आहे. या प्राचिन मंदिराचा जिर्णोध्दार वेळोवेळी झाला असून अलिकडे 1972 मध्ये मंदिराचा विस्तार वाढवून जिर्णोध्दार केलेला आहे. जिर्णोध्दार करताना मंदिर कलात्मकतेने नटवल्याने सध्य स्थितीतील हे मंदिर म्हणजे ऐतिहासिक, पौराणीक आणि आधुनिक कलेचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल. मंदिर उभारताना ज्योतिबा डोंगर येथील काळा पाषाण वापरून कलाकुसर केलेली आहे. मंदिरासमोरील एक टन वजनाचा पितळी नंदी व मंदिराच्या दोन्ही बाजूचे दीड टन वजनाचे व 22 फूट उंचीचे पितळी दीपस्तंब आकर्षक आहेत. मंदिराला आवर्जून भेट देण्याचे दुसरे कारण म्हणजे मंदिरात असलेली कोल्हापूरचे प्रख्यात रंगकर्मी कलायोगी जी. कांबळे यांची अप्रतिम तैलचित्रे छ. शिवाजी महाराजांचे शासन दरबारी मान्यता पावलेले जी. कांबळे यांची अस्सल तैलचित्रे येथेच आहे.