सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

शड्डू घुमतोय..!

पी. जी. पाटील श्री शाहू महाराज सन 1902 साली विलायतेला गेले. त्यावेळी त्यांनी ग्रीस साम्राज्याची राजधानी रोम नगरीस भेट दिली. ऑलिंपिक स्टेडियम व ओपन एअर थिएटर पाहिले आणि त्याचवेळी त्यांना आपल्याकडील कुस्त्याच्या मैदानातील उणिवेचे उत्तर सापडले. विलायतेवरून आल्यानंतर त्यांनी कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर, साठमारी या योजना आखून कामास सुरुवात केली. कुस्ती मैदानाच्या बांधकामास 1907 साली सुरुवात केली व फेब्रुवारी 1912 साली पूर्ण केले. या कुस्ती मैदानाची घडण अशी आहे की, मैदानात कोठेही बसले तरी कुस्ती आपल्यासमोर चालली आहे, असे प्रत्येकाला वाटते. कारण डोळ्याचा अँगल खाली असल्याने जवळ कुस्ती चालली आहे, असे वाटते.पाटाकडील तालमीनजीक रहात होतो व इ. 5 वी 11 पर्यंत विद्यापीठ हायस्कूल येथे शिक्षण घेत असताना शाळेला जाताना बालगोपाल तालीमजवळून मोतीबाग तालमीमार्गे जवळच्या मार्गे जात व तेथूनच घरी परत येत असत. मोठ मोठे पैलवान पाहून मलाही पैलवान व्हावे ही इच्छा झाली. प्रथम पाटाकडील तालीम व सुबराव गवळी तालमीत व्यायामासाठी जात. नंतर मोतीबाग तालमीत 1958 ला जाऊ लागलो.

मोतीबाग तालमीत जुने वस्ताद पठाण, कसबेकर, बाळू बिरे होते. पैलवान आंदळकरपासून अनेक लहान-मोठे पैलवान कुस्तीसाठी मेहनत करीत असत. वस्ताद पठाण रंगात आले की, पूर्वीच्या घटनांचे वर्णन करावयाचे. ते बुद्धिमान, कवी, पोवाडे, शायरी करायचे. एकदा त्यांनी खासबाग मैदानाचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराजांना लहानपणापासून कुस्तीचा नाद होता. त्यांनी लहान वयातच कागल मुक्कामी कुस्ती केली होती. राजांना निसर्गत:च भीमकाय देहयष्टी, निरोगी संपदा लाभली होती. कोल्हापुरात अंबाबाईच्या दारी मंगळवार, शुक्रवार या दोन दिवशी कुस्ती मैदाने भरावयाची. ही मैदाने जुन्या राजवाडय़ाच्या पश्चिमेच्या दरवाजाजवळ आजचे बी डिव्हिन पोलीस चौकी, बाबू जमाल दर्गा, मंगळवार पेठेतील विठोबा देवळ, शिवाजी थिएटर आताचे नवरे मंगल कार्यालय येथे होत होती. ही कुस्ती मैदाने संक्रांत, महाशिवरात्र, ईद , धूलिवंदन, जोतिबा यात्रा, शिवजयंती, नागपंचमी, माही, उरूस इत्यादी सणांना भरत असत. या मैदानाचे लोण प्रत्येक खेडय़ात पोचले. अशातर्‍हेची मैदाने सणा दिवशी प्रत्येक गावात होऊ लागली असून, ही प्रथा आजही खेडोपाडी चालू आहे.

वरील कोल्हापुरातील कुस्ती मैदाने सपाट जागेवर माती टाकून केली जायची. त्यामुळे प्रेक्षकांना कुस्ती नीट दिसायची नाही, त्यांना उभे राहून पाहावी लागायची. ही गैरसोय महाराजांच्या सतत लक्षात यायची. महाराजांना शाळा, कॉलेज, पिण्याच्या पाण्याचे तळे, रंकाळा जनतेच्या उपयोगी योजना करून त्या पूर्ण करण्याची सवय होती. कुस्ती मैदानाला खासबाग हे नाव ठेवणेच कारण.. मिरजकर तिकटीच्या राधाकृष्ण मंदिरानजीक एक बाग होती. तिचे नाव खासबाग. म्हणजे राजांच्या परिवारातील लोकांसाठी फिरण्यासाठी खास राखून ठेवलेली जागा. ही खासबाग सामाजिक बांधीलकी मानणार्‍या शाहू राजांनी मोडीत काढून कुस्ती आखाडा बांधला. कुस्ती मैदान काम 1907 ला सुरू करण्यात आले. प्रथम उत्तर, पश्चिम व दक्षिणेच्या बाजूने 20 फूट उंचीच्या भिंती किल्ल्याच्या तटासारख्या भक्कम केल्या आहेत. मैदानाच्या मध्यभागी कुस्तीचा 60 फूट व्यासाचा आखाडा, दोन फूट उंची गोलाकार आहे. स्टेजच्या उत्तरेकडून मैदानात पैलवान, वस्ताद यांना प्रेक्षकात मैदानात येण्यासाठी व दक्षिणेस राजे व मान्यवर मंडळी मैदानात येण्यासाठी, उत्तरेस येण्यासाठी दोन मोठे दरवाजे आहेत. या मैदानाचे काम दगडी जिना व त्या दगडी जिन्यावर पाण्याची टाकी व पाठीमागे टुमदार इमारत सदनाचे रेशनकार्ड कार्यालय बांधले आहे. या इमारतीतून राजघराण्यातील स्त्रिया कुस्ती पाहण्यास बसत. या मैदानाचे काम 1912 साली पूर्ण झाले आहे. खासबाग मैदानात प्रेक्षक बसण्यासाठी उतरण असल्याने कुस्ती स्पष्ट दिसते.

श्री शाहू खासबाग मैदानाचे उद्घाटन इमामबक्ष-मोहिदीन यांच्या चित्तथरारक कुस्तीने झाले. मैदान पूर्ण एक लाख प्रेक्षकांनी भरले होते. या मैदानातील नं. 1 ची कुस्ती इमामबक्ष यांनी जिंकली. शाहू महाराजांनी कोल्हापुरात खालील पैलवानांना आणले.

पै. सादिक, रमजी, गुटा, किकर, गुलाम , यात्रा, गोबरबाबू, जगज्जेता गामा, शहानवाझ तानीवाला, गुलाब भोईटदिन, गामा, गुलाम कादर, हादिमा, जिजा, भोला.

महाराष्ट्रातील पैलवानाबरोबर किंवा त्यांना जोड मिळाली नाहीतर पंजाबी विरुद्ध पंजाबी यांच्या कुस्त्या लावून कुस्तीचा शौक वाढविला. या मैदानात गणपत शिंदे, बाळ पानारी, गोपाळ परीट, कमाल अथणे, श्रीपती चव्हाण, बाबू बिटे, चंदर शिंदे, म्हादू हांडे, हरी पोवार, शंकर हेर्ले, सदाशिव वास्कर, देवाप्पा हलंगडी, आण्णाप्पा पाडळकर, विष्णू नागराळे, जिन्नाप्पा अकिवटे, दिनकर शिंदे यांच्या पंजाबी पैलवानाबरोबर कुस्ती झाल्या आहेत. याच मैदानात माणगावे खेळले आहेत. माझ्या पाहण्यात झालेल्या कुस्त्या पैलवान सादिक विरुद्ध केशव पाटील, सादिक विरुद्ध शिवा आरेकर, महंमद हानिफ विरुद्ध बिल्ला, हानिफ विरुद्ध सादिक, आंदळकर विरुद्ध सादिक, विष्णू सावर्डे विरुद्ध सादिक. यामध्ये सादिक यांनी सर्व कुस्ती मारल्या आहेत तसेच सादिक विरुद्ध गोगा, गोगा विरुद्ध गणपत आंदळकर यामध्ये गोगा विजयी, गणपत आंदळकर विरुद्ध नशीर पंजाबी ही कुस्ती चालू असताना संध्याकाळी अंधार पडला म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता कुस्ती लावली. या कुस्तीत आंदळकर विजयी झाले. मोतीबागचा चंबा मुत्नाळे विरुद्ध गणपत खेडकर यांची कुस्ती फार चांगली झाली. चंबाने कुस्ती जिंकली, बंडा पाटील व चंबा ही कुस्ती प्रेक्षणीय झाली. दादू चौगुले यांनी तर खासबाग गाजवून सोडले. त्यांनी 9 कुस्त्या या मैदानात केल्या. सन 1975 मध्ये रुस्तम-ए- हिंद या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा झाल्या. यामध्ये पैलवान सतपाल, मास्टर चंदगीराम, चंबा मुत्नाळ, गणपत खेळकर, हरिशचंद्र बिराजदार, वडार, आगAेक निग्रो इत्यादी 75 पैलवानानी भाग घेतला. होता. या स्पर्धामध्ये पैलवान सतपाल यांना 'रुस्तम -ए-हिंद' किताब मिळाला.