सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

न्यू पॅलेस व म्युझियम
राजवाडय़ाचा दरबार हॉल अप्रतिम असून याच्या खिडक्यांना रंगीत काचेची तावदाने असून येथे इटालियन चित्रकाराने छ. शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना चित्ररूप दिले आहे. राजर्षी शाहूंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त जून 1974 पासून राजवाडय़ाच्या एका मोठय़ा भागाचे रूपांतर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात केले आहे.
या संग्रहालयात अनेक अनमोल पेंटिग्ज, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू, परंपरागत राजचिन्हे, सोन्याचांदीच्या बहुमोल वस्तू, कलात्मक वस्तू, शिकारीतील भूसा भरुन ठेवलेली जनावरे, ट्रॉफीज, पूर्वी ज्या पद्धतीने दरबार भरत असे तशीच दरबाराची सुबक मांडणी अशी विविध दालने आहेत. म्युझियम सोमवारखेरीज सकाळी 9.30 ते 5.30 या वेळेत सर्वासाठी खुले असते. प्रवेश शुल्क आहे. राजवाडय़ाच्या परिसरात एक छोटेसे प्राणी संग्रहालयही असून त्यांच्यासाठी एक छोटेसे तळेही बांधले आहे. कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान 'नवा राजवाडा' म्हणून विख्यात आहे. शहराच्या उत्तरेस कसबा बावडय़ाच्या रोडवर रम्य वनश्रीच्या सानिध्यात कित्येक एकराच्या विस्तृत परिसरात पसरलेला हा राजवाडा म्हणजे कोल्हापूरचे आकर्षण आहे. इ.स. 1877 ते 1884 या कालावधीत अहिल्याबाई राणीसाहेबांनी ही ही इमारत बांधून घेतली. राजवाडय़ाचा नकाशा मेजर मँट या ब्रिटीश वास्तूशास्त्रज्ञाने तयार केला आहे. राजवाडय़ाच्या मध्यभागी घडय़ाळ्याचा मनोरा म्हणून ओळखला जाणारा अष्टकोनी मनोरा आहे. राजवाडय़ाची मुख्य इमारत दुमजली आहे. राजवाडय़ाच्या दोन्ही टोकांच्या खोली अष्टकोनी आहेत. राजवाडय़ात दरबार हॉल, बिलीयर्ड कोर्ट, अभ्यांगतांसाठी खोल्या आहेत. राजवाडय़ाच्या पाठीमागच्या बाजूस चौक असून त्याच्या मध्यभागी सुंदर कारंजे आहेत. चौकाच्या सर्व बाजूंनी अनेक खोल्या ओत. राजवाडय़ाच्या गच्चीवर थोडय़ा अंतरावर अतिशय सुंदर मनोरे व घुमट आहेत. राजवाडय़ाच्या शिल्पामध्ये निरनिराळ्या कालखंडातील हिंदू शिल्पशैलीचे उत्कृष्ठ मिश्रण आहे