सौजन्य संदर्भ - दैंनिक पुण्यनगरी, कोल्हापूर

जिल्ह्याचे सौंदर्य वाढवणारे धबधबे कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम घाट सह्याद्रीच्या घनदाट जंगलांनी व्यापलेला असून या परिसराला निसर्ग सौंदर्याचे वरदानच लाभलेले आहे. घनदाट जंगलातील दर्‍याखोर्‍यांच्या सानिध्यातील हा प्रदेश म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा प्रदेशही आहे. त्यामुळे निसर्गनिर्मित अनेक मन मोहून टाकणारे धबधबे या परिसरात निर्माण झालेले आहेत. जिल्ह्यातील हे सारेच धबधबे काही वर्षापूर्वीपर्यंत पर्यटकांपासून दूर होते. पण प्रसिध्दी माध्यमांच्याद्वारे हे विविध धबधबे आता पर्यटकांपर्यंत पोहोचले असून ते आता पर्यटकांची आकर्षण केंद्रे बनली आहेत. बर्कीचा धबधबा : कोल्हापूर-अनुस्कुरा मार्गावर कोल्हापूरपासून 60 कि.मी. अंतरावरील बर्की गावानजीक 2 कि.मी. अंतरावर असलेला हा धबधबा आता पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे. बर्कीच्या धबधब्याचे दर्शन घेण्यासाठी जात असताना सुळाचा, आसुळणे व निकाग्रे हे छोटे धबधबे चित्रपटातील दृष्याप्रमाणे पुढे सरकत राहतात. बर्कीचा मुख्य धबधबा म्हणजे 300 फुटांवरून जमिनीकडे झेपावणारा पाण्याचा प्रपात. त्यात डुंबण्यासाठी, तुषारात भिजण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असते.