राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. तसेच २३५ प्रकरच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. तर ३०० औषधी वनस्पती आढळतात.

प्राणी
दुर्मीळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ, बीबळ्या, पश्चिम घाटात दुर्मीळ आढळणारे लहान हरीण, गेळा (पिसोरी) यांचा समवेश होतो. तसेच गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवघळाच्या तीन जाती आढळतात.

डिसेंबर, १९५८ मध्ये जंगली जनावरांची हत्या थांबावी या दृष्टीने हे राधानगरीचे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्र राज्यातील अगदी सुरुवातीच्या काळात घोषित झालेले हे अभयारण्य आहे. राजर्षी शाहू सागर, लक्ष्मी सागर हे मोठे जलाशय, पश्चिम घाटातील सह्याद्रीची रांग यांच्या सान्निध्यात असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातूनच वाहतात. नंतर कृष्णेला हे सर्व प्रवाह मिळतात. 

अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा असे वृक्ष या जंगलात आहेत. बिबळ्या, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, मोठी खार, जंगली कुत्रे, हरीण असे प्राणी बघायला या जंगलात जंगलप्रेमी गर्दी करतात.  हे अभयारण्य खास गव्यांसाठी संरक्षित व प्रसिद्ध आहे. 

कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरुडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. भोगावती नदीवरील राधानगरी धरणाच्या परिसरातील या जंगलास दाजीपूर अभयारण्य असे म्हटले जाते. कोल्हापूरपासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५१ चौ. कि.मी. आहे