बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या. पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्‍या अधिकच सुंदर दिसतात. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजुनही आपणास संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात. महात्मा गांधी काही काळ या ठिकाणी वास्तव्य करुन शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच आंबोली घाटातून मार्गस्त झाले होते, असा इतिहास आहे. येथील भक्कम असे बुरुज असलेल्या ऐतिहासिक महादेव गडाचे अवशेष आपणास आढळून येतात. लेप्टनंट कर्नल मॉर्गन यांनी हा गड 1830 मध्ये जिंकला होता, अशी इतिहासात नोंद आहे. इंग्रज सैन्याच्या 14 व्या तुकडीतील एन्सन विलमॉट हा सैनिक 15 डिसेंबर 1832 रोजी येथे मारला गेला. त्याचे तसेच 2 एप्रिल 1893 रोजी मृत्यू पावलेल्या कर्नल लोथरट यांच्या पत्नीचेही थडगे येथील रस्त्यावर आढळून येते. कुडाळ, फोंडा, सावंतवाडी या कोकणातील महत्वाच्या मुलुखांवर महादेव गडावरुन टेहळणी करणे त्याकाळी सोपे जात असे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली घाटमाथ्याला हा घाट रस्ता आपणास घेऊन जातो. महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा मार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा मार्ग आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाट मार्ग अजूनही सुरक्षित आहे. या रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पहात घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरतो. पावसाळ्यात तसेच जोडून येणार्‍या सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्‍या खोर्‍यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. आंबोली पासून जवळच असलेल्या निसर्गरम्य अशा चौकुळच्या जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे असे वन्य प्राणी वास्तव्य करुन आहेत. शिवाय असंख्य प्रकारच्या वनौषधी या छिकाणी सापडतात. नुकत्याच चौकुळ येथील परिसरात 35 ते 40 लहान मोठ्या गुहा आढळून आल्या आहेत. काही गुहा तर अतिशय भव्य आहेत. जंगल पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना या गुहा साद घालतात. चौकुळ हे गाव गर्द वनराईने नटलेले असून, जैविक विविधता या ठिकाणी आढळून येते. आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो. महाशिवरात्रीस तर भाविकांचा ओघ येथे वाहत असतो. असे हे आंबोलीचे ठिकाण सर्वच ऋतुत आल्हाददायक आणि हवेहवेसे वाटणारे आहे. आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथे शिर्डीच्या साईबाबांचे समकालिन असलेल्या साटम महाराजांची समाधी आहे. ओबोलीचे मुंबईपासूनच अंतर 549 कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर 390 कि.मी. तर रत्नागिरी- आंबोली 215 कि. मी. आहे. सावंतवाडी हे आंबोलीच्या जवळ 26 कि.मी अंतरावर असणारे रेल्वे स्टेशन आहे. येथून बेळगांव 64 कि.मी. तर दाभोली (गोवा) 140 कि.मी. आहे. असे हे आंबोली आता उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले असून, दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात. पावसाळ्यात तर फेसाळणार्‍या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते.