आपत्कालिन परिस्थिती – नियंत्रण व व्यवस्थापन

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

कोल्हापूर शहरात २६ जुलै २००५, १५ जुलै २००६ या रंकाळा-पंचगंगेला पूर येऊन हाहाकार उडाल्याच्या तारखा. इ.स. २००६ व २००७ च्या एप्रिल-मे मध्ये टोकाचा उन्हाळा. ६ मे २००७ वादळाचा तडाखा. १९८९ पासून वर्षभर मैला सांडपाणीमिश्रीत पाण्यामुळे कावीळ, टॉईफॉईड,गॅस्ट्ने सारख्या जलजन्य रोगांनी पछाडलेला परिसर म्हणून कोल्हापूर सर्वांनाच परिचित . याशिवाय चिकन गुनिया, बर्ड फ्ल्यूसारख्या नव्या साथी आणि नव्या औद्योगिक क्षेत्रांबरोबर औद्योगिक क्षेत्रातील अपघातातून आपत्कालिन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता याबाबी नव्याने वाढत आहेत.

दगडासाठी खणलेल्या खाणीमध्ये भूकंपामुळे पाणी येऊन रंकाळा तलावाची निर्मिती झाली. ब्रह्मपुरी व जुन्या शहरातील अनेक भाग जमिनीखाली गाडले गेले तेही भूकंपामुळेच. वारणावतीच्या भूकंप केंद्र बिंदू कक्षाच्या उड्डाण रेषेतून अगदी जवळ. शहराची १/३ सीमा उद्योग-व्यावसायिकांनी घेरलेली. वाहनांची संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त. गणेश उत्सव, नवरात्र-दसरा, जोतिबा यात्रेमध्ये लाखो लोकांची गर्दी. या सर्वच बाबी भूकंप, पूर, वादळ, आग, गर्दी , चेंगराचेंगरी, अफवा, अपघात आदी आपत्तीच्या महत्त्वाच्या ठरतात.

कोल्हापूर जिल्हा व शहरासाठी शासनामार्फत तयार केेलेल्या आपत्कालीन व्यवस्थापनाचा आराखड्याची मागणी प्रशासनाकडे केल्यानंतर तो गोपनीय आहे असे हास्यास्पद उत्तर मिळाले होते. त्यानंतर माहितीच्या अधिकारात त्याची मागणी करता रु. २२०००/- भरा, असे सांगून दुसरा धक्का प्रशासनाने दिला. प्रत्यक्षात आराखड्यात असंख्य त्रुटी होत्या त्या वेगळयाच !

इ. स. २००५ च्या पूर स्थितीनंतर विज्ञान प्रबोधिनीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर इ.स. २००६ मध्ये आदर्श ठरेल इतपत चांगले व्यवस्थापन झाले आणि तसा आराखडा तयारही झाला. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये शहराचा आराखडा, शाळांसाठी आराखडा अशा मुद्यांचा आग्रह धरून तो कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण व्यवस्थापनापेक्षा नियंत्रण ही बाब जास्त महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन विनाशकारी पूर येऊ नये यादृष्टीने कारणे शोधण्याचा व मांडण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न केलेला आहे. ही प्रक्रिया सतत चालणारी आहे. त्यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. एका वर्षात अग्निशामल दलाला येणाऱ्या वर्दीची संख्या : २३९ ( संदर्भ : पर्यावरण अहवाल २००३-२००४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »