आबालाल रहिमान
आबालाल रहिमान हे सर्वात ज्येष्ठ चित्रकार. त्यांचा कलानिर्मितीचा कालही सर्वात जुना. १८८० मध्ये ते मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी होते. १८८८ पर्यंत ते मुंबईत होते. त्या काळात त्यांनी अहर्निश काम करुन कलासाधना केली व त्या साधनेच्या जोरावरच मरेपर्यंत म्हणजे सन १९३१ पर्यंत अव्याहतपणे कलानिर्मिती केली.
१८८० ते १८८८ या काळात त्यांनी आर्ट स्कूल मध्ये केलेली कामे स्कूलच्या जुन्या रेकॉर्डमध्ये पहावयास मिळतात. १८८८ मध्ये त्यांच्या एका चित्रांच्या एका संचासाठी त्यांना व्हॉईसरॉयचे (लॉर्ड डफरीन त्यावेळचे व्हॉईसरॉय) सुवर्णपदक देण्यात आले. गुळगुळीत पावडर शेडिंगच्या काळातही आबालाल यांनी लाईन ड्नॅइंर्गमध्ये स्वतंत्र्यपणे प्रस्थापित केलेली शैली पाहून त्यांच्यातील अभिजात कलागुणाची साक्ष पटते. स्कूल ऑफ आर्टमधील त्या वेळच्या अध्यापक वर्गात आबालाल विषयी किती आदर होता.
या विषयी रा. ब. धुरंधरांनी आपल्या पुस्तकात आवर्जून उल्लेख केलेला आहे. कुणा इतर कलावंतांशी तुलना करुन आबालाल यांच्यातील कलागुणाची महती पटवून देण्याचे कारण नाही. त्यांच्या चित्रांच्या सान्निध्यात अपरिमित आनंद प्राप्त करुन देणाऱ्या ज्या दृक् संवेदना होतात. त्यातूनच आबालाल यांच्यातील कलासामर्थ्याची प्रचिती होते.
आबालाल हे एक संवेदनाक्षम व प्रयोगशील चित्रकार होते. त्यांनी पुष्कळ प्रकारच्या तंत्रपध्दती वापरुन चित्रनिर्मिती केली असं त्यांचे शिष्य सांगतात. म्हणूनच त्यांची चित्रे ठराविक ठश्याची वाटत नाहीत. चित्रकला त्यांच्या बाबतीत केवळ व्यवसायाची बाब नव्हती तर ती एक प्रेरणाशक्ती होती. त्यांच्या अंतदृष्टीपुढे अव्याहतपणे असंख्य प्रतिमा एकमागून एक सरकू लागतात. त्यांचे संबंध व्यक्तित्व त्या व्यापून टाकतात. मग ते त्यातील मिळतील तेवढ्या प्रतिमा आपल्या माध्यमामधून अनुभवू पाहतात. अशा अव्याहतपणे चाललेल्या मंथनातून कधी पंधरावीस हजार चित्रे घडली हे त्यांनासुध्दा समजलं नाही.
पहिल्या चित्रापासून ते अखेरच्या चित्रापर्यंत त्यांचा शोध चालूच होता आणि तरीसुध्दा कोल्हापूरसारख्या कलाक्षेत्रातील घडामोडींच्या दृष्ठीने फारशा घटना न घडणाऱ्या अशा एकांतस्थळी सन १९२०-२१च्या सुमारास आबालालना ज्या कलामूल्यांचा शोध लागला होता, तो मुंबईतल्या कलाकारात पूर्णपणे रुजायला १९३५ साल उजाडावे लागले. यावरुन त्यांच्या प्रतिभेची झेप केवढी होती हे ध्यानी येते.