आमचा शाहू राजा…..! :
या पृथ्वीतलावर कोट्यावधी माणसं जन्माला येतात आणि निसर्ग नियमाप्रमाणे काळाच्या ओघात नाहिशी होतात. अशा माणसाच्या आठवणीसुध्दा जगाच्या स्मृतीपटलावरसुध्दा शिल्लक राहत नाहीत.

`जन पळभर म्हणतील हाय हाय!’ एवढेच त्यांच्या वाट्याला आलेले काही सुखद क्षण मृत्यूनंतरचे. अशा माणसांच्या जाण्याने समाजाचे अहित असे काही होत नाही आणि तो गेल्याने दु:ख कुटुंबियांना झालेच तर त्यामध्ये त्याच्या जगण्याच्या दु:खापेक्षा यांच्या उपभोगाच्या कल्पनांचा अतिरेक फार असतो. तसे पाहिले तर अशांच्या जीवनात आणि किड्या मुंग्यांच्या जीवनात तसा फारसा फरक असत नाही. तथापि, या पृथ्वीतलावर अशीही माणसं जन्माला येतात की, जी नियतीच्या फेऱ्यात देहविसर्जन करुन टाकतात. परंतु काळावरही मात करुन जगतच राहतात आणि ही खरी माणसं असतात कारण त्यांचे जीवन समुद्राच्या लाटेसारखे नसते तर प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्यांचे असते.
निराशा, आगतिकता, प्रवाहपतित होणे हे त्यांच्या स्वप्नातही नसते. तर संकटाचे महामेरु छेदून जाण्याची ताकद त्यांच्या ठायी असते. प्रवाहाला तडाखे देत आपला रथ नवक्षितिजांकडे झेपावत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी असते आणि अशा मार्गावर अडथळे उभे करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे धोरणी मन हा त्यांचा ठेवा असतो. गरुड झेप हा त्यांचा कानमंत्र असतो. तर माशाच्या डोळयावरची अविचल नजर हा त्यांचा ध्येयवाद असतो आणि म्हणूनच अशी माणसं सर्वसामान्य माणसांसारखी असूनही असामान्य असतात.
माणूस कुठं जन्माला आला यापेक्षा तो कसा जगला याला मोठे महत्त्व असते. कारण जगण्यालाच खरा अर्थ असतो. जर जन्माच्या ठिकाणावरुन श्रेष्ठत्व ठरवावयाचे असेल तर राजे रजवाडे, सावकार, गर्भश्रीमंत माणसं श्रेष्ठ आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेली माणसं ही नालायक ठरवावी लागतील. तथापि माणसाचे श्रेष्ठत्व जन्मावर आधारित कधीच नसते तर ते कर्मावर आधारित असते. मनुस्मृतीतील जन्मश्रेष्ठत्वाच्या कल्पनेचा आधार घेतलेल्या आणि जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या भिक्षुकशाहीतील माणसं आज विस्मरणाच्या पडद्याआड नाहीशी झाली आहेत, कर्म सिध्दांताचा पुरस्कार केलेली आणि माणुसकीचा धर्म तारणहार मानणारी माणसं आजही जिवंत आहेत.
काळ हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे असे इतिहाससिध्द झाले आहे आणि त्यामुळं जी माणसं आपल्यासमोर आदर्श म्हणून आपल्यासमोर बावनकशी सोन्यासारखी उभी राहतात. त्यामध्ये जन्मत: सुख ज्यांच्या पायावर लोळण घेत होते आणि यमयातनांची दोस्ती ज्यांना जन्मत:च लाभली होती, या दोन्ही स्तरांचा समावेश होतो.
पहिल्या प्रकारात राजवैभवावर लाथ मारुन मानव धर्माचा शोध घेणारा गौतम बुध्द, सम्राट अशोक, मध्ययुगीन काळातील छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा समावेश करावा लागेल. तर यच्चयावत् ज्ञानेश्वर, तुमाराम, चोखा मेळा, नामदेव यांच्यापासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत सर्व संतमहंतांचा उल्लेख करावा लागेल. तर शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असलेला म. ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींची नोंद घेतल्याशिवाय इतिहासाला पाऊल पुढे टाकणे शक्यच नाही.
आजपर्यंत इतिहासाने राजे-रजवाड्यांच्या जीवनसाक्षींची नोंद केली आहे. अर्थात काळाचे हे कामच आहे. काळाचे हितसंबंध कुठेही गुंतलेले नसल्याने जे घडले त्याची नोंद कोणत्याही परिणामांचा विचार न करता तो करीत असतो आणि म्हणून अशा नोंदी गौरवांकित जशा असतात तशा शोकांतिकेच्याही असतात.
इतिहासाच्या नोंदीचा विचार करता अनेक प्रजाहितदक्ष राजेरजवाड्यांनी आपली हजेरी गौरवांकित कालखंडात लावली असती तर अंधाऱ्या रात्री अथांग समुद्रात दीपस्तंभासारखे प्रकाशमान होणारे आणि अक्राळ विक्राळ समुद्राची भीती मनाशी न बाळगता समुद्राचे पाणी कापत ध्येयवेडेपणाने पुढे येणाऱ्या जहाजाप्रमाणे गौरवांकित राजेरजवाड्यात स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा राजर्षी शाहू हा राजा माणूस होता.
ना सत्तेचा कैफ, ना संपत्तीची धुंदी, ना राजेशाहीची घमेंड, ना गर्व, अत्यंत सरळ स्वभावी राजर्षी खऱ्या अर्थानं राजा माणूस होता. त्यांचेकडे गुणग्राहकता होती तसेच अन्यायाबद्दल चीडही होती. शोषितांचा तो कैवारी होता. पाण्यासारखा स्वच्छ अंत:करणाचा आणि वृक्षासारखा दो दो हातांनी सतत दुसऱ्यास देत राहणारे मन असलेल्या या राजा माणसाची स्थिती पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे पिंजऱ्यातील सिंहासारखी होती.
मात्र एकीकडे सतत संशयाने पाहणारे परकीय आणि दुसरीकडे या राजाचे दु:ख समजावून न घेणारे स्वकीय अशा कात्रीत सापडलेल्या शाहू महाराजांनी तशा परिस्थितीतही जी झुंज घेतली ती पाहून मन जर जन्मजात मोठेपणाच्या अहंकाराने किडलेले नसेल तर फुलूनच येईल असे म्हणावे लागेल.