आमचा शाहू राजा 1
राजर्षी शाहूंच्या ४८ वर्षाच्या आयुष्यात घडलेल्या बहुविध घटनांचा, मग ती घटना अत्यंत क्षुल्लक वाटणारी असो अथवा मोठी असो, मागोवा घेतला तर प्रत्येक घटनेच्या संदर्भाने झालेली कृती जमिनीतून वर येणारा प्रत्येक कोंब नवनिर्मितीच्या प्रेरणा घेऊन जसा बाहेर येतो. त्याप्रमाणे एक नवविचार घेऊन वाटचाल करीत असे असेच आढळून येईल. नवविचारांना कृतीशीलतेतून जन्म देणारा हा राजा खऱ्या अर्थाने कृतीशील विचारवंत होता.
जेव्हा विचारांना कृतीशीलतेची जोड मिळते त्यावेळी तो विचार वटवृक्षाचे रुप धारण करु शकतो आणि म्हणूनच आजही या राजा माणसानं दिलेला विचार सतत आळवावा लागतो. मानवाच्या आयुष्यात वेगळे वळण देणारी अशी एखादी घटना घडते की, त्यामुळे संपूर्ण आयुष्य कार्यालाच वेगळी दिशा लाभते. साधारणत: प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा घटना घडतात, तथापि वेळीच या घटनेची चाणाक्षपणाने आणि जाणीवत: नोंद घेणारी माणसं मात्र कमी सापडतात. राजर्षींच्या आंतरिक मनामध्ये विचारांचे काहूर माजू लागले, वैचारिक आंदोलन सुरु झाले आणि वर्णाश्रमाच्या उतरंडीवर असलेल्या समाजव्यवस्थेला त्यांनी आव्हान दिले.
राजर्षींची हिंदू धर्मावर श्रध्दा होती आणि त्यामुळे दररोज सकाळी शिवपूजा करण्याचा त्यांचा परिपाठ सातासमुद्राच्या मर्यादांच्या पलिकडेही अखंडपणे सुरु असायचा. १९०० सालातील ऑक्टोबर, नोव्हेंबर(कार्तिक) महिन्यातून एका सूंदर आणि विलोभनीय सुर्योदयाच्या प्रहरी आपल्या नेहमीच्या परिपाठाप्रमाणे राजर्षी पंचगंगा नदीच्या पात्रात येथेच्छ डुंबत धार्मिक रीतीरिवाजास अनुसरुन स्नान करीत होते आणि मनुभक्त श्री राजोपाध्ये, राजाचा वंशपरंपरागत भट, आशिर्वादपर मंत्रोच्चार करीत होते.
भटजीबुवांचे मंत्रपठण श्रवण वेदांचे शुद्रा बंद केले, या अविर्भावात चालले होते आणि त्यामुळे वेदोक्ताऐवजी पुराणोक्तांचा पाढा वाचला जातो. शास्त्राधाराप्रमाणे वैदिक मंत्र ऐकण्यास ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना मोठ्या मोठ्या मानभावीपणाने मिळालेली मान्यताही स्वजातीचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यास निघालेल्या तथाकथित शास्त्रांनी स्वकर्तृत्वावर काढून घेऊन पुराणोक्तांसाठी क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची योजना केली आणि राजर्षी शूद्रच असल्याने पुराणोक्ताचाच वापर अटळ आहे, असे मनुप्रणित मानवनिर्मित सिध्दांताप्रमाणे विश्वपुरुषाच्या मुखातून बाहेर पडलेल्या या ब्राह्मणांनी असा घात घातल्याचे आढळते. वैदिक आज्ञेच्या विरोधात चाललेला हा राजरोज प्रकार महाराजांच्यासमोर उपस्थित असलेल्या आणि ब्राह्मणांनी न ग्रासलेला राजारामशास्त्री भागवत या संस्कृत पंडिताच्या लक्षात आल्याने महाराजांचे लक्ष त्याकडे वेधण्यात आले. तसेच महाराजांसाठी मंत्र म्हणणारा ब्राह्मण आंघोळ न करताच हे काम करीत होता.
हे ही महाराजांच्या निदर्शनास आणले गेले. त्यावेळी जगी सर्वश्रेष्ठ असा कोण आहे, या ताठ्यात वेदोक्त फक्त ब्राह्मणांसाठी असलेल्या आणि शाहूराजा शूद्र असल्याने पुराणोक्त संयुक्तिक आणि पुराणोक्तांसाठी ब्राह्मणाने आंघोळ करण्याची गरजच काय असा उर्मट सवाल पाय धुववणी शूद्रा तीर्थ देतो । मुखरत पिती यवनीचा ।। अशा मनुष्य वंशजाने महाराजास केला आणि या प्रसंगातून निर्माण झालेल्या वादळाने महाराष्ट्नतील सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रियेस चालना मिळाली. तथापि, यामधूनच एका नवीन वादळाने जन्म घेतला.
त्या वादळाने मानवनिर्मित कृत्रिम समाजव्यवस्थेला तडाखे देत संपूर्ण समाजजीवन ढवळून काढले. नवसमाजनिर्मिती गतिमान झाली आणि मरगळलेल्या समाजात नवचैतन्य निर्माण झाले. १९व्या शतकात महात्मा फुले यांनी हाती घेतलेल्या कार्याची धुरा महाराजांच्या हाती आली आणि त्यांनी आपल्या सर्व शक्तीनिशी महाकाय अशा चातुर्वर्ण्याला आव्हान दिले. त्यादृष्टीने आपल्या संस्थानच्या कारभारास, ध्येयधोरणास दिशा देण्याचा प्रयत्न केला.
वेदोक्त प्रकरणाने शाहू राजा अंतर्मुख झाला होता आणि जर माझ्यासारख्या राजाची स्थिती अशी असेल तर सर्वसामान्य माणसांचे काय? हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. वर्षानुवर्षे जातवर्णाच्या नावाखाली दडपला गेलेल्या बहुजन समाजास शोषण मुक्त व्हावयाचे असेल तर समाजव्यवस्थेला लागलेला जातीयतेचा रोग समूळ नाहीसा करावा लागेल याची त्यांना आता खात्री झाली होती.
सामाजिक, आर्थिक विषमता नाहीशी करणे आणि माणसास माणसासारखी माणसाकडून वागणूक मिळावी यासाठी आता या नृपतीने लक्ष केंद्रित केले. मानव सारिखे निर्मिके निर्मिले । कमी के नाही केले ।। कोणी एक ।। या विचारांने राजर्षी प्रभावित झाले आणि िख्र्तास्, महमंद, मांग, ब्राह्मणासी ।धरावे पोटाशी बंधुपरी ।। अशी समाजव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्नशील झाले.
निसर्गानियमाप्रमाणे सर्व मानव समान असतात हा सिध्दांत पुनर्स्थापित करावयाचा असेल तर मानवनिर्मित मानवी विषमतेच्या उतरंडीची तोडफोड करण्यास पर्याय नाही. शाहू राजा होता. राजा म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करुन हुकूमशाही मार्गाचा अवलंब करुन शासकीय फतवा काढून यच्चयावत् जातीयता मानणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा देण्याचे फर्मान प्रसारित करण्याबाबत विचार करता आला असता.
तथापि, गुलामगिरी ही माणसाच्या मनातून काढून टाकावी लागते आणि त्यासाठी कायद्यापेक्षा मन:परिवर्तनाचा मार्ग स्वीकारावा लागतो हे या चाणाक्ष राजाला माहित होते. कारण कायद्याने माणसांची मने बदलणे अशक्य असते म्हणूनच जातीयतेचे भूत गाडून टाकण्यासाठी शाहू राजाने कृतीशीलतेचा अवलंब केला. यथा राजा तथा प्रजा हा त्यांच्या विचाराचा मूलाधार होता.
समाजव्यवस्थेत मूठभर स्वत:ला शहाणे समजणारे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक सोडले तर बहुसंख्यांकांना नवविचारांचे स्वागत करण्याचा उत्साह असतो. फरक एवढाच असतो अशा सामन्यांकडे तेवढे धाडस नसते, विचारांची परिपप्ता नसते, वैचारिक अधिष्ठानाचा अभाव असतो, सामन्यांपासून वरिष्ठांपर्यंत भीतीने तो ग्रासलेला असतो आणि त्यामुळे त्यास पाठबळ देणाऱ्या समर्थ नेतृत्वाची गरज असते. अर्थात, याचा अर्थ असा नव्हे की, जादूची कांडी फिरवावी आणि कायाकल्प व्हावा असे परिवर्तन समाजात घडून येते. कारण हजारो वर्षांचे कुसंस्कार पुसून टाकण्यासाठी काही कालावधी लागतोच.