आमचा शाहू राजा 2
राजर्षी शाहू महाराजांनी विषमतेवर पहिला भीमटोला टाकला तो जातीयतेच्या राक्षसाला आव्हान देऊन.गंगाराम कांबळयाच्या हॉटेलात जाऊन स्वत: चहा घेतला आणि राजा जर अस्पृष्यता पाळत नाही तर समाजाने का पाळावी हा संदेश देऊन टाकला. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून या राजाच्या हिमालयाएवढ्या उंच मनाची कल्पना येते. खरं तर पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे हा माणूस आकाशाएवढा मोठा वाटायला लागतो.
शिवाशिव आणि विटाळासारख्या खुळचट कल्पनांना त्यांनी विरोध केला. जे पाणी सर्व माणसांचे प्राण वाचविण्याचे काम करते ते पाणीही ब्राह्मणाने दिले तरच शुध्द आणि तेच पाणी अस्पृष्याने दिले तर अशुध्द असा रिवाज पाळला जात होता. एवढेच नव्हे जमिनीतून येणारा पाझर अस्पृष्यांच्या स्पर्शाने विटाळला जाईल अशी सर्वमान्य गैरसमजूत स्वार्थी लोकांनी आपली लायकी नसतानाही सर्वश्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवण्यासाठी पसरवली होती.
तथापि, राजपूतवाडी कँम्पामध्ये अस्पृश्याच्या हातून पाणी पिऊन या विटाळास शाहू राजाने तिलांजली दिली. हा प्रसंग त्यांच्या आंतरिक प्रेरणांवर प्रकाश टाकण्यास समर्थ आहे आणि याच आंतरिक प्रेरणेने प्रभावित होऊन राजर्षी शाहू जातीभेदाची शिकार झालेल्या बांधवांच्या पाठीमागे आईच्या ममतेने आणि पित्याच्या कर्तव्यनिष्ठेने उभे राहिले. राजर्षी शाहूंची याबाबतची भूमिका अत्यंत निकोप आणि सिध्दांताधिष्ठित होती. हे समजावून घेण्यास त्यांच्या एका भाषणामधील पुढील उतारा पुरेसा आहे.
`जातीभेद असू द्या पण जातीव्देष नको असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे मत प्रामाणिकपणाचे असल्यास त्यांच्या अज्ञानाची कीव केली पाहिजे. कारण जातिभेदाचे कार्य जातीव्देष आहे. तेव्हा कार्य नाहीसे करावयाचे तर कारणही काढून टाकले पाहिजे. या जातीव्देषेची उचलबांगडी करावयाची असेल तर जातीभेदच मोडला पाहिजे. जातीभेद मोडून केवळ जन्माच्या सबबीवर दुसऱ्यास हीन मानण्याची प्रवृत्ती नाहीशी होईल आणि अशा रीतीने जातीव्देषाचा नायनाट होईल तो सुदिन.’
जातीभेदाच्या निर्दालनासाठी शाहू महाराज भूमीची मशागत जातीवंत शेतकऱ्याप्रमाणे करीत होते आणि त्याचबरोबर फासेपारध्यांच्या पंगतीला बसून, महारांच्या घरी जेवण घेऊन, धनगरांची डांगर भाकरी खाऊन तथाकथितांच्या भाषेतील शूद्राच्या हातून पाणी पिऊन तर गंगाराम कांबळयाच्या हॉटेलात चहा पिऊन जातीभेद स्वत: मोडून टाकत होते. तथापि, शाहूरायास कल्पना होती की, आपण राजा आहोत म्हणून आपण आहोत तोपर्यंत मला लोक जरी घाबरत असेल आणि माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या राजसत्तेला घाबरुन ज्यांनी नेहमीच सत्ताधिशांसमोर लाचारीने वागून स्वत:ची तळी भरुन घेण्याचे काम केले अशी स्वार्थी वरिष्ठ जमातीतील मंडळी आपल्या पश्चात दुप्पट वेगाने समाजास रसातळास नेण्यास कमी करणार नाहीत, यासाठी शाहूराजास माणसामधील माणूस जागा करावयाचा होता.
त्यांचा स्वाभिमान जागवून मेलो तरी बेहत्तर परंतू स्वाभिमान सोडणार नाही, जगेन तर शेळीचे जिणे टाकून देईन आणि सिंहासारखा जगेन हा आत्मविश्वास लोकांच्या मनात निर्माण करावयाचा होता. याकरिता समाजाची मानसिकता जाणीवपूर्वक घडविणे आवश्यक होते. शारीरिक गुलामगिरी ताकदीच्या बळावर निपटून टाकता येईल परंतू मानसिक गुलामगिरी नाहीशी करावयाची असेल तर तशा मनांची बांधणी करावी लागते. अशा मनांची बांधणी व्हावयाची असेल तर त्यांच्या मनाचा विकास होऊन माणसांना विशाल दृष्टी प्राप्त झाली पाहिजे.
सर्वसामान्य माणसांचे विश्व हे डबक्यासारखे छोटेच राहिले आहे आणि त्यामुळे डबक्याबाहेर व्यापक विश्व आहे याची कल्पनाही त्यास असत नाही. इतिहास असे सांगतो की, सर्वसामान्य माणसं डबक्यात राहिली तरच आपले तथाकथित श्रेष्ठत्व टिकून राहील, याची पूर्ण जाणीव असलेल्या ब्राम्हण वर्गाने नेहमीच त्यांना डबक्यातच राहू दिले. नव्हे ते डबक्यातून बाहेर पडू नये यासाठी व्यूहरचना केली.
त्यातूनही एखादा डबक्यातून बाहेर पडू पाहू लागला तर पेटता अग्नी सहन न झाल्याने मृत पतीच्या चितेवरुन बाहेर पडू पाहणाऱ्या सतीस जसे चारी बाजूंनी काठ्यांनी बडवून त्यातच ढकलून तिच्या आयुष्याची राख केली जायची त्यापध्दतीने या अज्ञानाच्या डबक्यात बहुजन समाजास बेमुर्वतखोरपणाने त्यापध्दतीने अज्ञानाच्या डबक्यात ढकलून देण्यास ब्रह्मवृंद तयार असतात. हे डबके होते अज्ञानाचे, विद्याहीनतेचे आणि त्यामुळे म. जोतिबा म्हणतात.
विद्येविना मति गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
ही दु:स्थिती समाजाची बनली.
समाजातील शेवटच्या माणसाला माणूसपणाची शिकवण देऊन माणूस धर्म समजावून द्यावयाचा असेल तर त्याच्या मनाने क्षितिजाकडे ताठ मानेने पाहण्यास शिकले पाहिजे आणि त्या दिशेने शाहू राजाने टाकलेले पाऊल म्हणजेच अत्योंद्रयाचे तत्वज्ञान होय. समाजास लागलेल्या मानवनिर्मित कृत्रिम उच्चनीचतेच्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा मुळात रोग नाहीच, तो तर दिखावा आहे हे लोकांच्या ध्यानी येणे आवश्यक होते.
अंधारात रस्त्यावर पडलेल्या दोराच्या तुकड्यास साप म्हणून घाबरुन जाण्यासारखेच जातीयतेचा भूलभुलैय्या निर्माण करुन त्याला चुकीचा शास्त्राधार देऊन बहुजन समाजास घाबरवून सोडले होते. म्हणूनच यावर रामबाण उपाय होता तो म्हणजे ज्या शास्त्रांचा आधारावर जातीयतेचे राक्षस अश्वमेधाच्या ऐटीत स्वार नसून गाढवावरुन मिरवत आहे अशा निराधार शास्त्रांचा बुरखा फाडण्याचा, यासाठीचा मार्ग फक्त एकच आहे आणि तो म्हणजे `शहाणे करु सकलजना.’