आमचा शाहू राजा 3
शाहू या राजा माणसाने हे पक्केपणाने हेरले आणि आपल्या संस्थानात मन बांधणी करण्याची सुरुवात केली. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा म्हणून सर्वांना शिक्षणाची समान संधी देण्यास त्यांनी अग्रक्रम दिला.
वर्षानुवर्षे ज्यांना शाळेच्या आवाराजवळही त्यांच्या सावलीचा विटाळ होईल म्हणून फिरकू दिले जात नव्हते, अशा समाजास शिक्षणाची संधी शाहूरायाने प्राप्त करुन दिली. परिस्थितीने ग्रासलेल्या पालकाच्या मुलांची राहण्याची अडचण होऊ नये, पोटापाण्याची आबाळ होऊ नये म्हणून कोल्हापूर संस्थानात वसतीगृहांची स्थापना केली आणि ज्यांच्या अंगी गुण आहेत, शिकण्याची प्रबळ इच्छा आहे, नवीनतेची ओढ आहे.
अशांना हेरुन अशा शाळांमध्ये स्वत: लक्ष घालून प्रवेश देवविला. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तथापि, एवढ्यावर कार्यसिध्दी होणार नाही याची जाणीव होताच आपल्या राजेपदांच्या अधिकारांचा वापर करुन १९१६ ला सप्टेंबर महिन्यात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. उद्देश एवढाच की, आपली प्रजा शिकून शहाणी व्हावी, धार्मिक अंधश्रध्देतून मुक्त व्हावी.
शिक्षणाच्या सोयी सवलती उभ्या करीत असताना शाहूंच्या कार्यात कोलदांडा घालण्याचे काम स्वभावधर्मास अनुसरुन ब्राह्मण पंतोजी करीत होतेच. अशावेळी माळया, कुणब्यांच्या मुलांना शिकवा आणि त्यांचीच शिक्षक म्हणून नेमणूक केली तरच शूद्रांचे शिक्षण होऊ शकेल या महात्मा फूले यांच्या दूरदर्शी प्रतिपादनाची आठवण प्रकर्षाने येते. त्यावेळी वरिष्ठांसाठी आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र अशा शाळा होत्या अशा शाळांमधून लौकिकार्थाने शिक्षण तर होईल परंतू ज्या जातीयतेला मूठमाती देऊन समाजात नवचैतन्य निर्माण करावयाचे आहे.
त्या ध्येयाप्रत पोहचता येणार नाही याची जाणीव शाहूरायास झाली आणि यामधून अस्पृश्य व बिगर अस्पृश्य शाळांच्या एकत्रीकरणाच्या विचाराने जन्म घेतला. १९१६ च्या सुमारास काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, करवीर इलाख्यात (जहागिरी सोडून) अस्पृश्य लोकांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा असतात. त्या सर्व शाळा येत्या दसऱ्यापासून बंद करण्यात याव्यात व अस्पृश्यांच्या मुलांस सरकारी शाळातून इतर लोकांचे मुलांप्रमाणेच दाखल करुन घेत जावे. सरकारी शाळातून शिवाशिव पाळणेची नसल्याने सर्व जातींच्या व धर्माच्या मुलांस एकत्रित बसविले जावे.
स्वतंत्र्य भारताच्या राज्यघटनेत समानतेचे शैक्षणिक तत्वज्ञान जे आले आहे त्याचा उगम हा याच ठिकाणी तर झाला नाही ना? दूरदर्शी राजाचीच ही लक्षणे होती. तथापि, शाहूराजे एवढ्यावरच थांबले नाहीत कारण आपण जो आदेश देत आहोत. त्यावरील परिणामांची जाणीव होण्याऐवढी प्रगल्भ बुध्दिमत्ता त्यांच्याकडे होती. मनुचे वंशज यामधूनही अस्पृश्य मुलांची मानहानी करण्यास कमी करणार नाहीत याची खात्री त्यांना असल्याने आपल्या आदेशात पुढील इशारा दिला.
सरकारी मदत मिळणाऱ्या कोणत्याही शाळेत एखादा अस्पृश्य वर्गाचा विद्यार्थी आला तर संभावित गृहस्थाप्रमाणे आदरपूर्वक वागवून त्याला शाळेत घेण्यात यावे. शाळाखात्यातील कोणत्याही इसमाची अशी करण्याची हरकत असेल त्याने हा हुकूम झाल्यापासून सहा आठवड्याच्या आत आपला राजीनामा पाठवावा. तर त्याला पेन्शन मिळणार नाही. जर या कायद्यास, मदत मिळणाऱ्या शिक्षण संस्थांची हरकत असेल तर त्यांचीही ग्रँट किंवा इतर मदत दरबार बंद करील.
याचबरोबरीने शाहू महाराजांनी मल्लविद्या, संगीत, नाट्य, सहकार, शेतीसुधार, औद्योगिकरण अशा विविध क्षेत्रात नवविचारांची दालने उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या अवघ्या ४८ वर्षांचा आयुष्यातील प्रत्येक क्षण संस्थानातील जनतेच्या हितार्थ खर्ची घातला. राजा म्हणून त्यांना इतर क्षेत्रातील कार्य सहजसुलभ पध्दतीने करता येत होते. परंतू या राजाचे मोठेपण त्याने निवडलेल्या वाटावरुन सिध्द होते. हा राजा रुळलेल्या वाटेवरुन चालण्यास तयार नव्हता. इतर राजांप्रमाणेच राजवैभवाच्या सुखोपभोगात रमणारे त्याचे मन नव्हते. समाज उत्थापनाच्या चळवळीत हा राजा सर्वस्वाने सहभागी झाला यातच खऱ्या अर्थाने या राजाचे मोठेपण आहे असे माझ्यासारख्यास वाटते.
शाहू राजाने जे काही केले यासाठी त्यांच्या अभ्यासाची असलेली जोड नाकारता येणार नाही. तथापि, सर्व विद्वान मंडळी असा मार्ग का स्वीकारत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे कारण असे की, पढीक विद्वान आणि कार्यकर्ता यांच्यात भेद हा असतोच. कार्यकर्त्याला डोळस ज्ञानाची जोड मिळाली तर त्यामधून नवनिर्माण होते. शाहू राजांच्या कार्याची मूळ प्रेरणा त्यांचा आपल्या बांधवाप्रती असलेला मायेचा ओलावा होता. जे अंत:करणातून उचंबळून बाहेर पडते त्यामधील स्वाभाविकता दुसऱ्या कशात नसते आणि त्यामुळेच दास्यत्वाच्या युगानुयुगाच्या शृंखला तोडण्यासाठीचे मानसिक बळ त्यांना प्राप्त झाले.
राजर्षी शाहूंना तथाकथित ब्राह्मणांनी जरी त्रास दिला असला तरी या गुणग्राहक राजाने ब्राह्मणांचा कधी व्देष केला नाही. कारण तो मनस्वी राजामाणूस होता. त्यांनी जे केले ते ब्राह्मणास विरोधासाठी केले, ब्राह्मणी पद्धतीवर प्रहार केले आणि त्यामुळेच त्यांचे आणि लोकमान्य टिळकांचे आपुलकीचे संबंध इतिहासाने टिपून ठेवले आहेत. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या या राजाने त्यांना आईची ममता दिली.
हा राजा गाईसारखा दिलदार, सिंहासारखा स्वाभिमानी, हत्तीसारखा शक्तीवान अन्यायाच्या विरोधात उभा राहिला तर वाघासारखा असला तर प्रथमत: तो माणूस होता आणि नंतर राजा होता. त्यामुळेच सामान्य माणसांची सुखदु:खे तो पाहू शकला. राजा म्हणून आपल्या अधिकारात त्यांच्या दु:खांचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच या राजामाणसाचे कार्य आजही दिपस्तंभासारखे आपल्याला दिशा दाखविण्यास समर्थ आहे. अशा या दुरदृष्टीच्या युगप्रवर्तक राजाचा कोल्हापूरवासियांना साहजिकच `आमचा राजा’ म्हणून अभिमान आहे