कणेरी मठ

कोल्हापूरापासून फक्त १ मैलावर कणेरी हे एक छोटेसे गाव आहे. करवीर तालुक्यातील या गावात एक निसर्गरम्य उंच टेकडी असून तेथे प्राचीन काळी भगवान शंकराची स्थापना झाल्याचे इतिहास सांगतो. २ मैलाचा हा परिसर अत्यंत रमणीय आणि नैसर्गिक असा आहे. साधारणपणे १४ व्या शतकाच्या सुरूवातीला या परिसरात शंकराच्या पिंडीची स्थापना लिंगायत समाजातील धर्मगुरूंनी केली असावी असे बोलले जाते.

मूळ मंदिर पूर्णतया हेमाडपंथी बांधकामाचे आहे. मंदिरातील गाभारा १० बाय १० चा असून बाहेरील भागात दोन छोटे सभामंडप आहेत. शेवटच्या सभामंडपात काळया पाषाणाचा मोठा नंदी असून गाभाऱ्यातील मूळ मूर्ती काळया पाषाणाची आहे. मंदिराची उभारणी कलाकुसर केलेल्या दगडी खांबावर असून त्यातील कोरीव काम प्राचिनतेचे दर्शन घडविते. मंदिराभोवती प्रदिक्षणेचा मोठा मार्ग असून हा परिसर आवारात गणला जातो. प्राचीन काळी या परिसरात मोठा किल्ला अथवा बुरूज असल्याचे बोलले जाते.

सुमारे ५०० वर्षापूर्वी या परिसरात कालसिद्धेश्वर नावाच्या लिंगायत धर्मगुरूंनी शिवमठाची स्थापना करून मंदिरास उर्जितावस्था आणली. या परिसरात १२५ फूट खोलीची एक विहीर आहे. या टेकडीवर छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांनी भेटी देऊन मठाला देणगी दिल्याचे ऐतिहासिक दाखले सापडतात. ख्यातनाम मुस्लिम धर्मगुरू मिरासाहेब यांच्या निधनानंतर मिरजेबरोबर या टेकडीवर ही त्यांची समाधी बांधण्यात आली.

शिवरात्रीला २ लाख भक्तांची मोठी यात्राही भरते. यात्रेच्या वेळी येणाऱ्या भक्तांच्या देणगीतून अनेक छोटे मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. याचे संयोजन काडसिद्धेश्वर नावाच्या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने या टेकडीवर भगवान शंकर नंदी आणि दोन मोठे हत्ती उभे करण्यात आले आहेत. शंकराची ही मूर्ती ४२ फूट उंचीची आहे. या मूर्तीची शंकराच्या पिंडीवर प्रतिष्ठापना केली असून शंकराच्या जटेतून गंगेच्या रूपाने येणारे पाणी हत्तीमुखातून भक्तानंा देण्याची रामेश्वर पद्धतीची योजना कार्यान्वित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »