काशी विश्वनाथ मंदिर
श्रद्धाळू भारतीय मनाची परिसीमा म्हणजे काशी दर्शन, प्रयाग येथील त्रिवेणी संगम व गया येथील पिंडदान. पण करवीरच्या यात्रेकरूंना इतके कष्ट करण्याची काहीच गरज नाही. कारण ही तीनही क्षेत्रे कोल्हापुरातच आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात काशी यात्रेपेक्षाही या ‘दक्षिण काशी’चे महत्त्व अधिक मानतात.
महालक्ष्मी मंदिरात घाटी दरवाजाच्या बाजूला काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. तेथे कालभैरव, दंडपाणी, गंगा, धुंडिराज, गणेश ही काशीतील सर्व दैवते आहेत. तर मंदिरासमोर जाळीआड काशीकुंडात गंगा आहे. समोरच्या दीपमाळेत अगस्ती व लोपामुद्रा यांच्या मुर्ती आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या आवारात असलेल्या उद्यानात 1960 पूर्वी मणिकर्णिका तीर्थ होते. दुर्दैवाने हे मणिकर्णिका तीर्थ सध्या मुजवले गेले आहे. काशीकुंडात गंगा, मणिकर्णिका तीर्थाचे अस्तित्व व काशीविश्वनाथाचे मंदिर यामुळे कोल्हापूरला काशीचा मान आहे. करवीर माहात्म्यानुसार देवी या क्षेत्री आल्यावर पाठोपाठ शिव आले. त्यामुळे इतर सर्व देवता या ठिकाणी येवून राहिल्या.