कोटीतीर्थ मंदिर
कोल्हापूर शहराच्या पूर्वेस शाहूमिलजवळ एक मोठा तलाव आहे, या तलावात कोटीतीर्थ या नावाचे एक जुने देवस्थान आहे.
कोल्हापुरातील निसर्गसौंदर्याने नटलेले एक रमणीय स्थान म्हणून कोटीतीर्थाची ओळख आहे. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर असून अरूंद अशा मातीच्या भरावाने ते तलावाच्या शहराकडील बाजूच्या मातीच्या बंधार्याशी जोडलेले आहे. मंदिर साधे असून विशेष असे कोरीव काम नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे.
समोरील बाजूस अलीकडच्या काळात बांधलेला मंडप असून मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूस आंबराई असून तेथे नारायणदास महाराजांनी 1894 मध्ये बांधलेल्या इमारतीच्या मुख्य दिवाणखान्याच्या खालील लहानशा खोलीत ही समाधी आहे. इमारतीसमोर एक छोटा घाट असून याच्या पायर्या तळ्य़ाच्या पाण्यापर्यंत गेल्या आहेत.
या परिसराला कोटीतीर्थ हे नाव का पडले याच्या अनेक दंतकथा आहेत. एका दंतकथेप्रमाणे असुरांनी देवांवर विजय मिळवला असताना महालक्ष्मीने देवांच्या मदतीस धावून जावून एक कोटी असुरांना येथे ठार मारल्याने या जागेला कोटीतीर्थ असे नाव मिळाले. महालक्ष्मीनेच येथे कोटीश्वर लिंगाची स्थापना केली. दुसर्या एका कथेप्रमाणे पुष्करेश्वराने करवीरात हे तीर्थ निर्माण केले. या ठिकाणी भानुराजाने आपल्या कोटीजन्मींची पातके घालविली म्हणून याला कोटीतीर्थ किंवा पुष्करतीर्थ असे नाव पडले.
हे तीर्थ पापनाशिनी असल्याचे कल्पून आणि ते सर्व तीर्थात श्रेष्ठ असल्याचे समजून काहीजण कोल्हापुरात आल्यावर प्रथम दर्शन कोटीतीर्थाचे घेतात. येथे पूर्वी महालक्ष्मीचे मंदिर होते पण ते भूकंपात गडप झाल्याचीही समजूत आहे. कोटीतीर्थाजवळील स्वामी समर्थ मंदिर शांत व रमणीय आहे.