कोल्हापुरी गूळ
कोल्हापूरी गूळ साऱ्या भारतात प्रसिद्ध आहे. साऱ्या भारतीयांना गुळाची खरीखुरी चव शिकवली ती इथल्या शेतकऱ्यांनीच! साधारणत: ऑक्टोबर महिना सुरु झाला की कोल्हापूरच्या परिसरात ऊसाची गुऱ्हाळे सुरु होतात.
कोल्हापूरच्या श्री. शाहू मार्केट यार्डातील गुळाच्या बाजारपेठेत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या सौद्याला गूळ लावणारे अनेक शेतकरी आहेत.

गुऱ्हाळाला हंगामास वेग येतो तो नोव्हेंबर महिन्यापासून. जानेवारी ते मार्च महिन्यात गूळ निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. गुऱ्हाळाचा हंगाम सुरु झाला की अनेकांना निरनिराळी कामे मिळतात. गुऱ्हाळावर काम करणारी मंडळी जशी आजूबाजूच्या खेड्यातली असतात तशीच ती महाराष्ट्न् व कर्नाटकाच्या विविध भागातूनही येतात. काम करणाऱ्या मंडळींचे दोन गट असतात. फडकरी आणि घाणकरी! फडकऱ्यांनी उसाच्या फडात जावून ऊस तोडायचा, मोळया बांधायच्या आणि डोक्यावरुन, बैलगाडीने अथवा ट्न्ॅक्टरने गुऱ्हाळाच्या मांडवापर्यंत आणून टाकायचा. हे काम पहाटेपासून दुपारी बारा पर्यंत चालते.
घाणकरी मंडळींनी पुढची कामे करायची. ऊस घाण्यात घालायचा, रस काहीलीत सोडायचा, काहील चुलवाणावर ठेवायची. चुलवाणात जळण घालायचं काम चूलमाऱ्यांनी करायचं. लांब काठीने म्हणजे ढेरण्यानं जळण हालवायचं. ऊसाची वाळलेली चिपाडं, शेंगांची टरफलं, जळण म्हणून वापरतात. जळणात बचत व्हावी म्हणून अलिकडं वायूवीजनाच्या शास्त्रीय तत्वावर आधारलेली चिमणी चुलाण्यावर बांधलेली आढळते.
गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेतील प्रमुख तज्ञ म्हणजे गुळव्या! गुळव्या जेवढा हुषार असेल तेवढा तो उत्तम प्रतीचा गूळ तयार करतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली काहीलीत शिजणाऱ्या रसावरील मळी काढणे, भेंडीच्या झाडाच्या फांद्या वापरणे, गूळ पावडर, गोडे तेल, दूध यांचा वापर करणे ही कामे चालतात. रसाचा पाक होताच पाकातील कणी वरचेवर पाहण्याचे काम गुळव्या करतो. सूचना मिळताच मंडपकरी चुलाणावरुन काहील उचलतात. वाफ्याजवळ आणतात.
गुळव्याची सूचना मिळताच तो पाक वाफ्यात ओततात. गुळव्या तो पाक सतत हालवत राहतो. गूळ तयार होतो. गरम असतानाच घमेल्यातील ओल्या फडक्यावर ओतून घमेली भरली जातात. पुढे गूळ थंड झाला की रवे तयार होतात. एका गुळव्याचे वजन २६ ते ३० किलो असते. एका आधणासाठी तीन तासाचा वेळ खर्च होतो व साधारणत: ८ ते ९ रवे तयार होतात. एका रात्रीत ४ आधणे काढली जातात. गुऱ्हाळ खर्चापैकी माणसांचा हजेरीचा दर रात्रीवर असतो. गुळव्याची दिवसाची हजेरी मात्र खास असते.
तयार झालेला गूळ श्री. शाहू मार्केट यार्डातील गुळाच्या व्यापारपेठेत सौद्यासाठी लावला जातो. गुळाच्या प्रतीप्रमाणे सौद्यात तज्ञ व्यापारी सौदा बोलतात.
गुळाला दर चांगला मिळाला तर उत्पादन खर्चाच्या मानाने शेतकऱ्याला नफाही चांगला होतो. लाखो रुपयांची उलाढाल होते. कोल्हापूरचा गूळ महाराष्ट्नप्रमाणे गुजराथ भागाकडेही जातो.
या गुळाच्या हंगामात मुलाबाळांना घेऊन गुऱ्हाळाला जाणं, ऊसाच्या रसाबरोबर गुळाची चव घेणं यात कोल्हापूरकर मंडळी रमलेली असतात.
भारताचा ग्रामीण अर्थ व्यवस्थेत गूळ निर्मितीसारख्या कुटिरोद्योगास महत्त्वाचे स्थान आहे. गूळ जसा औषधी तसा शक्ती निर्माण करणारा. देशातील एकूण ऊसापैकी ५४% ऊस गूळ व खांडसरी साखर निर्मितीसाठी वापरला जातो. महाराष्ट्नच्या अर्थव्यवस्थेत कोल्हापूरची गुळाची व्यापारपेठ मोठा हातभार लावते.
असे हे ऊसाचे गुऱ्हाळ आणि कोल्हापुरी गूळ! कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांना एखाद्या गुऱ्हाळाला भेट देता आली तर एका वेगळा अनुभव त्यांना अनुभवता येईल. ते शक्य झाले नाहीच तर कोल्हापूरी गुळाची छोटी छोटी आकर्षक पाकिटे सर्वत्र मिळतात. कोल्हापूरचा हा मेवा सोबत नेण्यास विसरु नका.