खिद्रापूर
कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात.
आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.
खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण कोपेश्वर देवालय आहे. खिद्रापूरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. सांगली – खिद्रापूर या मार्गे यावे. सुमारे ३ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या खिद्रापूरचे ‘ कोपेश्वर ‘ हे ग्रामदैवत आहे.