घनकचरा : एक ज्वलंत प्रश्न

सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.

शहरामध्ये तयार होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण सध्या प्रती दिवस १५० ते १८० टन इतके आहे. भविष्यात वाढती लोकसंख्या व इतर अनुषंगिक व्यवसाय कृतीमुळे त्यात अधिकाधिक वाढ होणार आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणी त्याचे वर्गीकरण करणे, वाहतूक करणे, प्रक्रिया करणे, याशिवाय शिल्लक राहणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अशा जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत.

सध्या शहरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल :

घरगुती कचरा : स्वयंपाक, साफसफाई, दुरुस्त्या, पुन्हा-पुन्हा सुशोभिकरण, पॅकिंग मटेरीअल, आवेष्टने, खराब कागदपुस्तके, प्लॅस्टिक पिशव्या यामुळे कचरा तयार होतो.

नागरी घनकचरा : रस्ते, नागरी सार्वजनिक सुविधा, कार्यालये, फेरीवाले, बांधकामे पाडल्यामुळे तयार होणाऱ्या कचऱ्याचा यात समावेश होतो.

व्यापारी कचरा :कार्यालये, दुकाने, उपहारगृहे, हॉटेल, बाजार, मंडई, वखारी यांमधून तयार होणारा कचरा.

औद्योगिक कचरा : लघुउद्योग व त्या अनुषंगिक इतर उत्पादने व प्रक्रिया यातून तयार होणारे टाकाऊ पदार्थ व वेष्टने आदींमुळे होणारा कचरा तयार.

राख – उद्योग धंद्यातून फेकली जाणारी राख, घरांमधून तसेच चिरमुरे, ब्रेड तयार करणाऱ्या व्यवसायातून फेकली जाणारी राख, स्मशान भूमीतून तयार होणारी राख ही घनकचऱ्यातील मोठा घटक आहे.

अवजड कचरा : घरगुती खराब झालेली साधने-उपकरणे, फेर्नचर-वाहनाचे टाकाऊ भाग, टायर, लाकूड अशा अनेक वेड्यावाकड्या व साठवणुकीमुळे जागा व्यापणाऱ्या वस्तूंचा यामध्ये समावेश होतो.

मृत प्राणी : गाय, म्हैस, कुत्री यांसारखे प्राणी मृत झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे सहज शक्य नसते. मृतदेह उघड्यावर पडल्यामुळे, कोंडाळयात टाकल्यामुळे गंभीर प्रश्न तयार होतात.

मटण व मासे मंडई : यामधून तयार होणारा टाकाऊ पदार्थांचा कचरा.

बांधकाम करण्यातील व पाडापाडीमुळे होणारा कचरा : यामध्ये विटेचे तुकडे, सिमेंट-वाळूचे मिश्रण, दगड, काँक्रीटचे तुकडे, फळया, बांबू, प्लॅस्टिक, तारा, खिळे, पाईप व सॅनिटरी मटेरिअलचे तुकडे, फरशा आदींचा यामध्ये समावेश होतो.

ई-कचरा : जुने संगणक, थर्माकॉल, बॅटऱ्या, दूरदर्शन संच,ट्यूब, सेल , कागद अशा बाबी यामध्ये समाविष्ट करता येतात.

घातक कचरा : रुग्णालये, चिकित्सालये, प्रयोगशाळा यांमधून बँडेज, रक्तातील घटक, शरीराचे खराब अवयव, बाटल्या आदींसारखा बाहेर पडणारा कचरा.

वरील ११ गटांमधून शहरांमध्ये कचरा तयार होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याची विल्हेवाट करणेचे नियोजन करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »