छत्रपती शहाजी वस्तुसंग्रहालय

वाड्यातील छत्रपती शहाजी महाराजांची ख्याती इतिहासप्रेमी रसिक, वाचक, पर्यटक इतिहास भवन अशी होती. कोल्हापूरचे श्रद्धास्थान म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त सन १९७४ दि. ३० जून रोजी श्रीमंत शहाजीराजानी आपल्या संग्रहातील अनेक दुर्मिळ मौल्यवान वस्तूंचा संग्रह एकत्रित करून स्वतंत्र असे संग्रहालय उभा केले.

हे संग्रहालय छत्रपती शहाजी संग्रहालय म्हणून सुपरिचित आहे. संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगाची म्हणून दुर्मिळ चित्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, अलंकार, मौल्यवान वस्तू, राजचिन्हे, सोन्याच्या चांदीच्या बहुमोल वस्तू, तलवारी, भाले, शिकारीतील अनेक दुर्मिळ हत्यारे पहावयास मिळतात.

हत्तीवरील चांदीची अंबारी, हत्तीसाठी वापरले जाणारे दागिने, चांदीचा हौद, सोन्याच्या चौऱ्या, अब्दागिरी, पालखी, चांदीचे आसन, विविध प्रकारची शस्त्रास्त्रे, बंदूका, तोफा या सारख्या शेकडो वस्तू म्हणजे करवीर नगरीचा ज्वलंत इतिहास, या वाड्यात शाहू राजांनी शिकार केलेली अनेक बलाढ्य जनावरे भुशाने भरून ठेवलीत, महाराजांचा दरबार, खुर्चीची मांडणी, दरबाराचे सभागृह, बैठक व्यवस्था, राजर्षी शाहू राजा या खऱ्या अर्थाने रयतेला लोकप्रेमी राजा असल्याच्या शेकडो आठवणी, छत्रपतींची वंशावळ, छत्रपतींची घराण्याची परंपरा, जुन्या ऐतिहासीक भव्य सोहळयांचे प्रदर्शन, राजर्षी शाहू राजाचे हस्ताक्षरातील अनेक पत्रव्यवहार, परदेशातून मिळालेल्या अनेक भेट वस्तू, पूर्वीचा राजदरबार, परदेशी पाहुण्यांच्या भेटी, कुस्ती मैदानातील अनेक प्रसंग सारेच कांही या वस्तू संग्रहालयात पहावयास मिळेल. प्रत्येक पर्यटक हे वस्तू संग्रहालय पाहिले की, धन्य व कृतार्थ होतो आणि छत्रपतींच्या जुन्या स्मृतींची आठवण करून आनंदअश्रुने पाणावून निरोप घेतो.

हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असून नाममात्र शुल्क घेऊन पहायला मिळते. महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावरील हे ठिकाण. सिटी बससाठी ही स्वतंत्र व्यवस्थाही आहे. नक्की बघावे असे इतिहासाचे साक्षीदार म्हणून नवा राजवाडा प्रसिद्ध स्थान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »