टाऊनहॉल म्युझियम
कोल्हापूर शहरातील ही गॉथिक शैलीत बांधलेली अत्यंत सुंदर वास्तू असून तिला दोन मनोरे आणि अत्यंत निमुळते छप्पर आहे. येथे 500 माणसे एकावेळेला बसू शकतील असे प्रशस्त सभागृह असून सभागृहाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन खोल्या, प्रशस्त व्हरांडय़ाने जोडलेल्या आहेत.
टाउन हॉलच्या दर्शनी भागी आकर्षक द्वारमंडप असून त्याच्यावर गच्ची आहे ती सभागृह व सज्जा यांना जोडली आहे. ही अत्यंत सुंदर इमारत 1872 ते 1876 या कालखंडात बांधली असन त्याकाळी ती संस्थानाची कार्यालयीन इमारत होती. सध्या ही इमारत पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून येथे 1947 पासून शासकीय वस्तुसंग्रहालय आहे. या वस्तुसंग्रहालयात सध्या सात विभाग असून त्यात संकीर्ण कलाकृती, शस्त्रास्त्रे, उत्खननातील वस्तू, नाणी, शिल्पाकृती, ताम्रपट, शिलालेख आहेत.
ब्रह्मपुरीच्या उत्खननात सापडलेल्या कोल्हापुरच्या इतिहासाच्या इसवीसन पूर्वीपासूनच्या महत्त्वाच्या वस्तू येथे प्रत्यक्ष पाहता येतात. वेळोवेळी कलाकृतीचे प्रदर्शन भरवण्यासाठी एक प्रशस्त हॉलही येथे आहे. चित्रकलाकृती विभागात आबालाल रहमान, बाबुराव पेंटर आदी कोल्हापुरच्या आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती येथे आहेत.