टाऊन हॉल – वस्तुसंग्रहालय
ही छोटी टुमदार इमारत १८७६ साली बांधली गेली. इमारतीच्या मध्यभागी एक गॅलरी असलेले सभागृह असून दोन्ही बाजूस खोल्या आहेत. समोर व्हरांडा आहे. या इमारतीचा उपयोग संस्थानकाळात कार्यालयासाठी व इतर कामासाठी केला जात असे.
काही वर्षाच्या दिवाण ऑफिस व त्यानंतर टेलिफोन एक्स्चेंज या इमारतीत होते. सध्या या इमारतीचा उपयोग पुरातत्व विभाग, महाराष्ट्न् शासन यांच्या कोल्हापूर वस्तु-संग्रहालय या करिता केला जातो. या इमारतीभोवती एक सुदंर बाग आहे. या बागेत. दक्षिणेला काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीकरिता कांच महाल बांधलेला आहे.
इमारतीच्या समोरच छ. शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारलेला आहे. संस्थानकाळात या बागेकरिता दरबारकडून वर्षाला चार हजार रुपये मिळत असत. टाऊन हॉलमधील वस्तुसंग्रहालय उद्घाटन दिनांक ३० जानेवारी १९४६ रोजी झाले. हे संग्रहालय शुक्रवार पेठेतील जैन स्वामींच्या मठात मांडण्यात आले होते.
सध्या या वस्तुसंग्रहालयात एकूण सात विभाग आहेत. त्यात शस्त्रास्त्रे, संकीर्ण कलाकृती, उत्खनन वस्तू, नाणी, शिल्पाकृती, शिलालेख व ताम्रपट, चित्रकला कृती यांचा समावेश होतो. या सात दालनाखेरीज आणखी एक दालन प्रदर्शन दालन म्हणून राखून ठेवण्यात आले आहे.
या दालनाचा उपयोग वस्तूसंग्रहालयामार्फत वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या विशेष प्रदर्शनासाठी केला जातो. तसेच स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींची वैयक्तिक प्रदर्शने भरविण्यासाठी या दालनाचा उपयोग केला जातो. संग्रहालयाची वेळ १०.३० ते ५.३० असून प्रवेश शुल्क आहे. संग्रहालय रविवारी बंद असते.
टाऊन हॉल सभोवतालच्या बागेत प्राचीन वृक्ष व काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती पहावयास मिळतात. दक्षिण कोपऱ्याला महादेवाचे एक सुंदर देवालय आहे. ही बाग म्हणजे जुन्या मोठ्या वृक्षांच्या घनदाट शांत छायेचे एक आल्हादकारी ठिकाण आहे.