डोंगरावरील कात्यायनी
कोल्हापूरातील अनेक प्राचीन मंदिरामुळे या नगरीवर एक वेगळा सांस्कृतिक प्रभाव निर्माण झाला आहे. कोल्हापूराच्या मध्यवर्ती देवी महालक्ष्मी मंदिर आणि सभोवताली या देवीच्या रक्षणार्थ पूवाश्रमी इतर देवदेवता अधिष्ठिता झाल्या होत्या.
पूर्वेला सिद्ध बुटकेश, पश्चिमेला देवी त्र्यंबोली, उत्तरेला जोतिर्लिंग मंदिर, दक्षिणेला डोंगरावर देवी कात्यायनी आजही स्थानापन्न आहे. प्राचीन कालापासून या देवतेचा इतिहास आढळतो. करवीर माहात्म्य ग्रंथात चर्तुहार यात्रा क्र. ९ अ मध्ये देवीच्या दर्शनाचा मार्ग व उपक्रमाची नोंद आहे. प्राचीनकाळी ही कोल्हासूर राक्षसाने रर्क्तेंीज नावाचा राक्षस या परिसरात क्षेत्र रक्षणासाठी ठेवला होता. दरम्यान महालक्ष्मी देवीने कोल्हासूर राक्षसाबरोबर युद्ध पुकारले.
देवीने या क्षेत्रातील रर्क्तेंीज राक्षसावर चाल करून जाण्यासाठी भैरवला पाठविले. परंतु रर्क्तेंीजावर प्रहार केला की त्याच्या रक्तातून अनेक राक्षस निर्माण होऊ लागले. तेंव्हा भैरव हतबल झाला. देवीने त्वरीत कात्यायनीला धाडले. कात्यायनीने “अमृतकुंड” तयार केले व रक्तातून तयार होणारे मायावी राक्षस अमृतकुंडात ठेवले व भैरवाचे मृत सैन्य पुन्हा उभा करून कात्यायनीने रर्क्तेंीज राक्षसाचा नाश केला अशी पौराणिक कथा करवीर माहात्म्य ग्रंथात २० व्या खंडात आढळते.
ऐतिहासीक नोंदीवरून असे आढळते की, ह्या परिसरात पूर्वी छत्रपति राजर्षि शाहू महाराज, राजाराम महाराज, अक्कासाहेब महाराज आदी कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजघराण्यातील व्यक्ति शिकारीसाठी भेटी देत. या देवीचे दर्शनाला ही मंडळी सातत्याने येत असत. कोल्हापूरच्या नित्य धावपळीच्या जीवनाला कंटाळलेल्या करवीरकरांसाठी, परस्थ भक्तासाठी हे मंदिर एक आकर्षण ठरावे असे आहे.
