ध्वनी व वायू प्रदूषण
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
शहरात वाहनांचे वेगवेगळया प्रकारचे हॉर्न व वाहनांची वाढती संख्या यामुळे सण-समारंभ-उत्सव यानिमित्ताने
होणारा ध्वनीवर्धकांचा वापर तसेच दिवाळीमध्ये आणि एरवीही आनंद व्यक्त करण्यासाठी उडविण्यात येणारे
मोठ्या आवाजाचे फटाके यामुळे ध्वनी प्रदूषण होते. एका मर्यादेपेक्षा हे प्रदूषण वाढले तर त्यामुळे कर्णबधिरत्त्व
येणे, रक्तदाब वाढणे, एकाग्र न होता येणे यासारखे अनेक विकार जडू शकतात. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी
सार्वजनिक वाहनांचा अधिक वापर किंवा सायकलसारख्या वाहनांचा वापर जसा उपयुक्त ठरतो, त्याचप्रमाणे
ध्वनीवर्धकांचा मर्यादित प्रमाणातच वापर करणे, आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके उडविण्यापेक्षा वेगळा मार्ग
अवलंबणे महत्त्वाचे आहे.
दिवाळी दरम्यान कोल्हापूर शहरातील आवाजाची पातळी
सकाळ | संध्याकाळी | |||||
किमान | कमाल | सरासरी | किमान | कमाल | सरासरी | |
वेळ दिवाळीपूर्वी | ५७.६६ डे. | ६३.६६ डे. | ६०.६६ डे. | ६३.८३ डे. | ६९.५० डे. | ६६.६६ डे. |
दिवाळी दरम्यान | ६२.३३ डे. | ६९.६६ डे. | ६५.९९ डे. | १०६.०० डे. | ११८.८३ डे. | १०८.४१ डे. |
शहरातील सरासरी ध्वनी प्रदूषण पातळी ५२ ते १२५ डेसिबल इतकी आहे. ती प्रमाणित मानकापेक्षा जास्त आहे.
(संदर्भ : पर्यावरण स्थिती अहवाल म.प्र. नि.मं. २००४-२००५)
वायू प्रदूषण पातळी
शहरातील वाहनांच्या वर्दळीमुळे गर्दीच्या ठिकाणी वायू प्रदुषणाची पातळी तीव्र होते. अशा वायू प्रदूषणामुळे
श्वसनाचे विकार, डोळयाची जळजळ, दमा, ब्राँकॉयटिस, कर्करोग असे गंभीर विकार उद्भवू शकतात.
सद्यस्थितीत अशा वायू प्रदूषणामुळे कोल्हापूर शहरातील रुग्ण संख्या वाढते आहे.