रंकाळा तलाव – करवीर चौपाटी
कोल्हापूरवासियांच्या फिरण्याचे व हवा खाण्याचे प्रमुख ठिकाण म्हणजेच रंकाळा तलाव होय. रंक भैरव हे शिवाचे रुप आणि या नावावरुनच याला रंकाळा हे नाव पडले आहे. पूर्वी येथे एक दगडाची खाण होती. या खाणीतील दगडांचा उपयोग शहरातील काही जैन व हिंदू मंदिरांसाठी केला गेला.
आठव्या किंवा नवव्या शतकाच्या सुरवातीस भूकंप होऊन ही खाण रुंद झाली व त्यामध्ये पाणी साठले. दक्षिणेकडून दोन ओढे या तलावात येऊन मिळतात. तलावाच्या पश्चिम बाजूने नैसर्गिकरित्या पाणी बाहेर जाते. सन १८८५च्या सुमारास हा तलाव बांधून घेण्यात आला. हा तलाव बांधण्याचा मूळ हेतू गावात पिण्यासाठी पाणी पुरवणे हा होता.
तो उद्देश साध्य झाला नाही पण रंकाळयामुळे शहरामध्ये एक रमणीय निसर्ग सौंदर्यस्थळ निर्माण झाले. रंकाळयाच्या परीघ सुमारे तीन मैल असून मध्यभागी खोली सुमारे तीस ते चाळीस फूट आहे. समोरच पैलतीरावर सुंदर शालिनी पॅलेस, उत्साहवर्धक वातावरण, नयनरम्य निसर्ग, शीतवारा दिवसभराचा थकवा दूर करुन नवचैतन्य, नवा ताजेपणा निर्माण करतात. त्यामुळे हे स्थळ लोकप्रिय न झाल्यास नवल. त्यामुळे रंकाळा चौपाटी हे करवीरकरांबरोबरच पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे.
संध्याकाळी हा परिसर गर्दीने फुललेला असतो. लहान मुलांना खेळण्यासाठी येथील बागेत सोयी करण्यात आलेल्या आहेत. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलची व गाड्यांची येथे रेलचेल दिसून येते. जवळच शांतकिरण स्टुडिओ आहे.
रंकाळा तलावातच दक्षिणेला एक संध्यामठ नावाची जुनी सुंदर वास्तू आहे. सुंदर कोल्हापूर योजनेखाली रंकाळा तलाव अधिक आकर्षक बनवण्याचे काम सुरु आहे.