रत्नाप्पा कुंभार
डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली.
ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.
१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.
रत्नाप्पांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भरमाप्पा व आई गंगूबाई होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. माध्यमिक शिक्षण हातकणंगले या तालुक्याच्या गावी झाल्यावर १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात गेले.
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्यासाठी स्थापन केलेल्या वीरशैव वसतीगृहात राहून त्यांनी १९३३ साली बी.ए.ची पदवी संपादन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी एल्.एल्.बीच्या पहिल्या वर्गात प्रवेशही घेतला. मुलगा चांगले शिकत असलेले पाहून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांनी रत्नाप्पांचे लग्न ठरविले व मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील पार्वतीबाई यांच्याशी १९३४ साली रत्नाप्पांचा विवाह झाला.