रामलिंग परिसर
कोल्हापूर जिल्ह्यातील धुळेश्वर व रामलिंग ही प्राचीन धार्मिक स्थळे प्रसिध्द आहेत. भाविकांचे श्रध्दास्थान असलेली ही स्थळे हल्ली पर्यटकांचीही आकर्षणे बनली आहेत. या रमणीय परिसराची माहिती . . .
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावाजवळ धुळेश्वर व रामलिंग ही प्राचीन काळातील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. हजारो वर्षापूर्वीची धार्मिक पार्श्वभूमी असलेली ही दोन्ही ठिकाणे आज पर्यटकांचे व भाविकांचे आकर्षण स्थळे म्हणून विकसित होत आहेत. धुळेश्वर, आलमप्रभू व रामलिगं ही तीन ठिकाणे जवळजवळ असल्याने खूप दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना एकावेळी तीन पुरातन क्षेत्रे पाहण्याची संधी मिळते.
धुळेश्वराचे मंदीर सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते. पूर्वी या गावाचे नाव ईश्वर होते. त्यावरून या गावाला धुळेश्वर असे संबोधले जाऊ लागले. धुळेश्वराचे मूळ स्थान उज्जैनजवळ महांकाळेश्वर येथे आहे. धुळेश्वराचा परिसर हा एकूण चाळीस एकरांचा आहे.
धुळेश्वराच्या खालच्या बाजूस म्हसोबाचे मंदीर असून तो धुळेश्वराचा राखणदार समजला जातो. चैत्र शुध्द पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी अनुराधा नक्षत्रावर या ठिकाणी यात्रा असते. विजयादशमीच्या कालावधीतही येथे मोठी यात्रा भरते. हातकणंगल्यापासून धुळेश्वरापर्यंत वाहन रस्त्याची सोय आहे. मंदिराच्या परिसरात पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी व दोन कूपनलिका आहेत.
मंदिराच्या शिखरानजीक बारमाही जिवंत पाण्याचा झरा आहे. जवळच मल्लेया मंदीर आहे. दर अमावस्येला पालखीची प्रदक्षिणा मिरवणूक निघते. मंदिरासमोर एक मोठा नगारखानाही आहे. रविवारी व गुरूवारी भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते.