शंकराचार्यांचा मठ
श्रीमद्जगद्गुरू पहिले शंकराचार्य यांनी जे चार मठ स्थापिले, त्यापैकी शृंगेरी मठ एक होय. या मठावर अधिष्ठित असलेल्या श्रीविद्याशंकरभारती यांनी कोल्हापूर येथे शंकराचार्यांचा मठ इसवी सनाच्या १३ व्या शतकात स्थापिला. हा मठ स्थापना करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी कोल्हापूरला आलेले धार्मिक महत्व हेच होय.
ज्याला लोक दक्षिणकाशी असे मानतात व जेथे महालक्ष्मीचे अत्यंत पवित्र स्थान आहे, या महातीर्थाच्या ठिकाणी आपला मठ असावा, असे या स्वामींना वाटले तर त्यात नवल ते काय? कोल्हापूरच्या मठाधीश शंकराचार्यांची जी बिरूदावली आहे, त्यांत “अभिनव पंचगंगातीरवास कमलानिकेतन करवीरसिंहासनाधीश्वर श्रीविद्याशंकरभारती स्वामी” (म्हणजे पंचगंगा नदीच्या तीरी असलेल्या आणि जेथे महालक्ष्मींचे स्थान आहे.
अशा करवीर क्षेत्री स्थापना झालेल्या सिंहासनाचे पदाधिष्ठित श्रीविद्याशंकरभारती स्वामी) असा उल्लेख असतो. यावरून पंचगंगेचा काठ आणि महालक्ष्मीचे देवालय या दोन गोष्टींमुळेच शंकराचार्य कोल्हापूरांकडे आकर्षित झाले असावेत, हे स्पष्ट होते. याच बिरूदावलीवरून मठाकरिता पंचगंगेच्या काठाची जागा निवडली गेली असावी, हे समजून येते.
या निवडीस आणखी एक कारण सांगता येईल. मठ म्हणजे समाधीची जागा हे विसरून चालणार नाही. समाधी ही पवित्र नदीच्या काठी असावी अशी इच्छा असणे स्वाभाविकच आहे, आणि म्हणून शंकराचार्यांन आपल्या मठासाठी आणि पर्यायाने समाधीसाठी पंचगंगेच्या काठी जागा निवडली असावी, असे मानता येईल.

