शालिनी पॅलेस

रम्य सायंकाळी रंकाळा तलावाशेजारील हा राजवाडा ! नयनरम्य निसर्गपरिसर पाहून भान हरपावे आणि या राजवाड्याची रंकाळा तलावात पडलेली छाया पाहून यमुनेत छाया पडलेल्या ताजमहलची आठवण व्हावी असा हा आकर्षक वाडा म्हणजे शालिनी पॅलेस होय.

उत्कृष्ट शिल्पकृती, भव्यता आणि आकर्षकता याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हा राजवाडा. हा वाडा चौरसाकृती असून दुमजली आहे. चार मनोरे व त्याभोवतालचे घुमट त्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतात नव्हे तर त्यांच्यामुळेच वाड्याचे सौंदर्य वाढले आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळच पुढील बाजूस एक मोठा मनोरा इतर मनोऱ्यापेक्षा अधिक उंच असून सूंदर नक्षीकामाच्या खाबांवर उभारलेला आहे. वाड्याभोवती सुंदर उद्यान असून एक छोटा घाटही आहे.

एकांत व शांत वातावरण इथे चांगले निर्माण झालेले आहे. ह्या राजवाड्यात बाहेरील बाजूपेक्षा आतील बाजूस फारच सुदंर कोरीव काम केलेले आहे. या वाड्याची उभारणी अलिकडे म्हणजे १९३१ ते १९३४ च्या काळात झालेली असून त्याची त्यावेळची किंमत सुमारे आठ लाख रुपये होती. सुंदर गोष्टींची किंमत करणे चूकच नाही का? जे सुंदर आहे, आकर्षक आहे ते अमूल्यच असते.

राजस्थानातील अनेक ऐतिहासिक राजवाड्यांचे ज्याप्रमाणे तारांकित हॉटेल्समध्ये रुपांतर झालेले आहे, त्याचप्रमाणे शालिनी पॅलेसदेखील आता तारांकित हॉटेल झाले आहे. महाराष्ट्नतील हे एकमेव पॅलेस हॉटेल आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रत्यक्ष राजवाड्यांचे दर्शन मात्र आता हॉटेलसमोरील रंकाळयाच्या काठावरील बागेतूनच घ्यावे लागते. कालाय तस्मै नम: दुसरे काय म्हणणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »