श्री शाहू खासबाग कुस्त्यांचे मैदान
कोल्हापूर हे शहर कुस्ती या खेळाबद्दल अखिल भारतात प्रसिध्द आहे. श्री. शाहू खासबाग मैदान हे या पेशातील लोकांचे मानाचे स्थान आहे. या खासबाग कुस्ती मैदानात आजपर्यंत अगणित लहान मोठ्या कुस्त्या खेळल्या गेल्या, असंख्य पैलवान या मातीत नावारुपाला आले आणि या मैदानाने करोडो लोकांच्या डोळयांचे पारणे फेडले.
हे मैदान मंगळवार पेठेत असून जुन्या राजवाड्यापासून चालत पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे. हे मैदान अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून अशा प्रकारचे मैदान पिचतच असेल. याचा आकार पूर्ण गोलाकृती असून मध्यभागी कुस्ती खेळण्याचा मोठा आखाडा आहे. या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कु स्त्या केल्या जातात.
सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी व व्यवस्थित कुस्ती पाहता यावी म्हणून उतरण आहे. या मुळे सर्व मैदानाचा आकार एखाद्या खोलगट तबकासारखा दिसतो. पूर्व व पश्चिम दिशांना प्रवेशाची सोय आहे. पूर्वेला निमंत्रित व मान्यवर व्यक्तींना बसणेकरिता मोठा मंच असून त्यावर मंडप उभारलेला आहे. या मंचाचा उपयोग रंगमंच म्हणून खुल्या नाट्यप्रयोगासाठी वा इतर कार्यक्रमासाठीही केला जातो.
आखाड्याभोवती व प्रेक्षकांनी ठराविक अंतराच्या आत येऊ नये म्हणून दोन वर्तुळकार लोखंडी कठडे तयार केलेले आहेत. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकीमध्ये बसू शकतात. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असून त्यालगतच केशवराव भोसले नाट्यगृह आहे.