प्रश्न फेरीवाल्यांचा
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
फेरीवाल्यांकडे असून अडचण नसून खोळंबा अशा दृष्टिकोनातून पाहण्याची सर्वांना सवय आहे. विशेषत: वाहतूक नियोजन करणाऱ्या यंत्रणांना फेरीवाल्यांच्या हातगाड्या डोळयासमोरही नको असतात. रस्त्यावर वेड्यावाकड्या लावलेल्या खाजगी वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत असला तरी त्याची फेरीवाल्यांकडून होणाऱ्या अडथळयाइतकी चर्चा होत नाही. वास्तवात फेरीवाल्यांकडून मिळणारी सेवा आज शहरातील सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात विविध वस्तू उपलब्ध करून देणारी आवश्यक व्यवस्था आहे. फेरीवाल्यांच्या व्यवसायाच्या स्वरुपातील आवश्यक व्यवस्थेला अडचण बनविण्याला शहरनियोजनातील त्रुटीच अनेकदा कारणीभूत ठरत असतात. नियोजनातील त्रुटी दूर करणे, कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे, फेरीवाल्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देऊन फेरीवाले संघटनांच्या सहभागाने योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे या प्रकारे फेरीवाल्यांचा प्रश्न हाताळणे शक्य आहे.
फेरीवाले शहरातील ५०% जनतेला सामान्य दरात सुविधा पुरवितात. वीज, सजावट, शोरुम, नोकर अशा खर्चातून बचत करतात. ताजे व स्वच्छ पदार्थ देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या व्यवसायाचा परिसर स्वच्छ ठेवतात. गैरमार्गाने पैसे मिळविण्यापेक्षा कष्ट करतात. अनेक कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. शिवाय शहराच्या अर्थव्यवस्थेचा ते महत्त्वाचा भाग आहेत. दररोजच्या उलाढालीत ते स्थानिक व्यापारी वर्गांकडून खरेदी करतात आणि सामान्य जनतेला सेवा देतात. जकात चुकविणे, कर बुडवणे असा गैरप्रकार त्यांच्याकडून होत नाही.
जर चारचाकी, दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून फेरीवाल्यांना हटवावे अशी भूमिका असेल तर ती चूक ठरेल, त्यापेक्षा शहर नियोजनात त्यांच्यासाठी जागा निश्चित करून व फेरीवाल्यांना शिस्त लावून सहभाग देणेच योग्य ठरेल.