पंचगंगा खोऱ्यातील प्रश्नांची मांडणी
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
- संपूर्ण खोऱ्यातील सर्व गावांमधून, नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतून बाहेर पडणारे सांडपाणी रोखावे. त्यावर सांडपाण्याची प्रत व आकारमान यांस अनुसरून योग्य ती प्रक्रिया निश्चित करावी. निर्मलग्राम, हागणदारी मुक्त गावे, जलस्वराज्य आदींसारख्या योजनांचा उपयोग करून नदी पात्रात सांडपाणी, मैला येणार नाही याचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करावे.
- खोऱ्यातील सर्व साखर कारखाने व आसवनी (डिस्टिलरी) यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी, स्पेंट वॉश व अन्य पदार्थ नदी पात्रात किंवा जलस्त्रोतांमध्ये येणार नाहीत या दृष्टीने प्रक्रिया यंत्रणा अद्यावत करण्यात यावी. उसाचे क्षेत्र, गाळप क्षमता, प्रक्रिया यंत्रणा आदींचे परस्परांवर येणारे ताण व प्रदूषण विचारात घेऊन प्रक्रिया केंद्रे दुरुस्त करावित.
- खोऱ्यातील शेती क्षेत्रात वापरास बंदी असलेली रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके वापरण्यात येतात. त्याच्या विक्री व वापरास आळा घालावा. तसेच अशी रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके थेट नदी पात्रात किंवा स्त्रोतामध्ये येणार नाहीत याविषयी जनजागृती करण्याचे काम हाती घ्यावे.
- घनकचरा : या खोऱ्यातील दाट लोकसंख्या असलेल्या कोणत्याही नगरपालिका, म.न.पा. हद्दीत घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत सक्षम नाही. परिणामी प्लॅस्टिकसह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात किंवा जलस्त्रोतामध्ये मिसळत असल्याने प्रदूषणाची तीव्रता वाढते. त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे.
- औद्योगिक वसाहती, चर्मोद्योग वसाहत : जवाहरनगर मधील चर्मोद्योग वसाहत, उद्यमनगर, वाय.पी.पोवारनगर, शिरोली, गोकुळशिरगांव औद्योगिक वसाहती मधून बाहेर पडणाऱ्या घन, द्रव, वायू स्वरुपातील कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सक्षम नाही. यासाठी एकत्रित स्वरूपाची प्रक्रिया केंद्रे उभी करून त्यामधून बाहेर पडणारे पदार्थ नदी किंवा जलस्त्रोतांमध्ये येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- हॉस्पिटल, दवाखाने, प्रयोगशाळांमधून बाहेर पडणाऱ्या जैव-वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दास एंटरप्राईजेस हा प्रकल्प आहे. त्यामध्ये सर्व वैद्यकीय व्यावसायिक सभासद नाहीत. हा प्रकल्प फक्त जैव-वैद्यकीय घन कचऱ्यासाठी आहे. द्रवरूप कचऱ्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. प्रस्तावितयोजना ही छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासाठी होणार आहे. इतर सर्व हॉस्पिटल, दवाखाने, प्रयोगशाळा यांच्यासाठी तशी आवश्यक योजना पूर्ण करून सांडपाणी व इतर घटक प्रदूषणास कारणीभूत ठरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
- धार्मिक कारणांनी होणारे नदी व जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी, तलावाजवळ निर्माल्या कुंड, मूर्ती विसर्जन कुंडाची निर्मिती करण्याची गरज आहे. मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरीस व रासायनिक रंग यांपासूनचे प्रदूषण टाळण्यासाठी मूर्तीच्या आकारावर निर्बंध आणण्याची व इतर पर्यायांचा विचार व कृती करण्याची गरज आहे. उदा. धातूची मूर्ती, शाडूची नैसर्गिक रंगात रंगवलेली मूर्ती, दरवर्षी तीच मूर्ती वापरणे, घरच्या घरी मातीच्या कुंडीत विसर्जन, सुपारीला मूर्ती मानून पूजा व विसर्जन इ.
- मृतदेहांची राख नदीत विसर्जित करण्याची पद्धत बदलून ती राख झाडांसाठी किंवा शेतीमध्ये मिसळण्यासाठी वापरात यावी. या राखेपासून स्मृती उद्यानासारखी कल्पना कार्यान्वित करावी. यासाठी स्मशानभूमीच्या बाहेर रक्षाकुंड ठेवण्याची व्यवस्था करावी.
- कोल्हापूर पद्धतीचे बंधारे नदी पात्रात असल्यामुळे ठिकठिकाणी नदीचा प्रवाह खंडित होतो. अशा दोन बंधाऱ्यादरम्यान सांडपाणी किंवा प्रदूषक घटक मिसळल्यास नदी प्रदूषणाची तीव्रता वाढून मासे व अन्य जीव मृत्यूमुखी पडलेले दिसतात. यावरून पाण्याच्या प्रदुषणाची तीव्रता स्पष्ट होते. पाणी प्रवाह खंडित न होता तो प्रवाहित राहिल व बंधाऱ्याच्या तळातून पाणी वाहून पुढे जाईल असे नदी पाणी पुरवठ्याचे नियोजन असणे आवश्यक आहे.
- पश्चिम घाटातील बेकायदेशीर खाणकामामुळे येणारा गाळ व जमिनीची धूप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात येणारा गाळ हा नदी प्रदूषणाचे महत्त्वाचे कारण ठरतो. अशा बॉक्साईट खाणी बंद करणे व धूप नियंत्रणाची कामे प्रस्तावित करणे गरजेचे आहे.