नांदी पर्यावरणसमृद्धतेची
सौजन्य संदर्भ – “नांदी पर्यावरण समृद्धतेची” कोल्हापूर नागरीकांचा पर्यावरणीय जाहीरनामा, संपादन – उदय कुलकर्णी, संपर्क – कोल्हापूर पर्यावरणीय जाहीरनामा समिती, द्वारा : २६१ ई, १८, शिल्पा अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६ ००३.
हा जाहीरनामा म्हणजे कोल्हापूर शहरासाठी पर्यावरण समृद्धीची नांदी ठरावी अशी सर्वांचीच इच्छा असल्याने जाहीरनाम्याचे नामकरण नांदी पर्यावरणसमृद्धतेची असे होणे साहजिक होते.
आधी पंचवीस कार्यकर्त्यांनी लेखन करायचे, मग ते सर्व कार्यकर्त्यांसमोर वाचायचे, त्यानंतर मसूदा तज्ञांना वाचण्यासाठी
देऊन त्यांच्या सूचना मसुद्यात समाविष्ट करायच्या अशी पद्धत जाहीरनाम्याचा मसूदा तयार करताना
अवलंबण्यात आली. अर्थात अशी पद्धत अवलंबली तरी हा जाहीरनामा म्हणजे अंतिम शब्द अशी
जाहीरनामा प्रकाशित करणाऱ्या समितीची भूमिका नाही. या जाहीरनाम्यात त्रुटी असू शकतात, वेळोवेळी
त्या दूरही केल्या जाऊ शकतात. काळ व परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे जाहीरनाम्यात नव्या बाबींचा
समावेश व्हायला हवा. हा जाहीरनामा म्हणजे केवळ आजच्या तरुण पिढीतील कार्यकर्त्यांनी कोल्हापूर
शहराचा विकास व पर्यावरणीय प्रश्न याबाबत एकत्रित स्वरूपात मांडणी करण्याचा केलेला प्रयत्न आहे.
असा प्रयत्न कोल्हापुरात होत आहे हे समजल्यावर मेधा पाटकर, डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ
कार्यकर्त्यांपासून ते डॉ. जयंत नारळीकर, डॉ. शिवराम भोजे, डॉ. विलास संगवे, डॉ. आर. व्ही. भोसले
अशा शास्त्रज्ञांपर्यंत आणि प्राचार्य लीलाताई पाटील यांच्यासारख्या शिक्षणक्षेत्रातील तज्ञांपासून ते कुलगुरू
डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे मनापासून स्वागत केले. कोणाला
हा जाहीरनामा दबावनामा म्हणून उपयुक्त ठरेल असे वाटले तर कोणाला रुजू पाहणाऱ्या या बी मध्ये उद्याचे
झाड दिसले. इ. स. १९७३ मध्ये लेफ्टनंट जनरल कै. एस. पी. पी. थोरात यांच्या अध्यक्षतेखालील
समितीने प्रादेशिक नियोजन मंडळासाठी कोल्हापूरचा भविष्यकालीन नियोजन आराखडा तयार केला होता.
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. विलास संगवे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील असे मान्यवर त्या समितीचे सदस्य होते.
तथापि डॉ. संगवे यांनी नांदी पर्यावरण समृद्धतेची या जाहीरनाम्याचा मसूदा वाचला आणि मनमोकळेपणाने
सांगितले की आम्ही आराखडा केला तेव्हा सर्वव्यापी शाश्वत विकासाशी निगडित पर्यावरणीय दृष्टीकोन
नव्हता ! आम्ही केलेला चांगला आराखडा शासनाच्या दुर्लक्षामुळे बासनातच राहिला. या चांगल्या
जाहीरनाम्याचे तसे होऊ नये !
कोल्हापूर शहरातील नागरीकांचा जाहीरनामा म्हणजे ऐतिहासिक वास्तूंचे जतनविषयक आराखडा, तसेच
सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक, स्त्रीविकास विषयक, शेती बाजारपेठ विषयक, भौतिक
सुविधाविषयक, पर्यटनविषयक आणि कायदेविषयकही स्वतंत्र आराखड्यांची आवश्यकता स्पष्ट करणारा
दस्तऐवज आहे असे काही मान्यवरांना वाटते आहे. जाहीरनाम्यामागील वैचारिक भूमिका जास्तीतजास्त
नागरीकांनी स्वीकारावी यासाठी तसेच केलेल्या उपाययोजनावजा सूचनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न
करणे हे यापुढील आव्हान आहे. राजकीय इच्छाशक्ती जागी करणे, नियोजन व अंमलबजावणी करणारे
यांना योग्य दृष्टीकोनासह कृतीशील बनविणे आणि लोकसहभाग अशा सामुदायिक प्रयत्नांनीच आपण ते
समर्थपणे पेलू शकू !
-संपादक
प्रथमावृत्ती : ५ जून. २००७, पर्यावरण दिन
द्वितीयावृत्ती : २ ऑक्टोबर, २००७, म. गांधी जयंती