ओंकारेश्वर मंदिर
विठोबा मंदिराच्या प्रांगणात पूर्वेस असलेले हे मंदिर विठोबा मंदिरापेक्षा मोठे असून या मंदिरावर तुलनेने कोरीव काम जास्त आहे. मंदिराला गर्भगृह, अंतराळ, नंदीमंडप अशी रचना असून अतिशय कलात्मक व शिल्पवैभवाने नटलेली प्रवेशद्वारे हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे.
या मंदिराच्या नंदीमंडपाचे छत बाहेरून कलात्मक असे 16 खांब व आतून 4 खांब अशा एकूण 20 खांबावर तोललेले आहे. छताच्या 16 खांब असलेल्या भागावर बाहेरील बाजूंनी चोहोबाजूंनी जैन तीर्थकरांच्या मुर्तीची रांग आहे. नंदीच्या वरील बाजूचे छतावर शिल्पकलेचा अत्युत्तम अविष्कार दाखवत फुललेले कमळ खोदण्यात आले आहे. गर्भगृहात शिवपिंडी असून अंतराळगृहातील खांबाची रचना महालक्ष्मी मंदिराच्या खांबरचनेशी मिळती-जुळती आहे.
मंदिराच्या प्रांगणात एकमुखी दत्त मंदिर, राम-सीता मंदिर व मारुती मंदिर आहे. मारुती मंदिर 20 व्या शतकातील आहे. पण एकमुखी दत्त मंदिरातील मूर्ती मात्र प्राचीनत्व दर्शवते. दत्तमंदिरासमोर एक छोटे शिवमंदिर असून याच्या आजुबाजूला अनेक विरगळ असलेल्या शिल्पशिला आहेत. हे विरगळ अन्यत्र आढळणार्या विरगळाच्या तुलनेत मोठे असून शिल्पकामही जास्त आहे. त्यामुळे या शिल्पशिला महत्वाच्या योद्ध्यांच्या असाव्यात असा तर्क आहे.