शालिनी पॅलेस
पर्यटकांचे व कोल्हापुरकरांचे आवडते ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव रंकाळा चौपाटी. या रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर 1931 ते 1934 च्या कालखंडात शालिनी राजेंच्या नावाने बांधलेला भव्य व देखणा राजवाडा म्हणजे शालिनी पॅलेस. मुळातच हा परिसर रमणीय आहे.
रंकाळ्य़ाच्या एकांतात व शांत वातावरणात, निसर्गासोबत उभी असलेली ही राजवाडय़ाची भव्य वास्तू मध्ययुगीन पद्धतीची आहे. ही इमारत दुमजली असून आयताकृती आहे. तिच्या चारही बाजूच्या कोपर्यावर चार चौकोनी मनोरे असून त्यांच्यावर घुमट आहेत. मुख्य दरवाजाच्या दर्शनी बाजूला आणखी एक चौकोनी मनोरा असून तो इतर मनोर्यांपेक्षा उंच आहे.
या चौकोनी मनोर्यावर अनेक कोन असलेला आणखी एक मनोरा असून त्याला सुबक बांधणीच्या स्तंभाचा आधार आहे. या मनोर्याच्या वरच्या बाजूला घुमट आहे. राजवाडय़ाच्या आसमंतात विस्तृत पटांगण असून समोर सुंदर बगिचा आहे.
राजवाडय़ाच्या अंतरंगात अनेक दालने असून अत्यंत कलात्मकरित्या उत्तम सजावटीने सजवली आहेत. भव्यता, देखणेपण व वास्तुशिल्पातला एक अभ्यासनीय नमुना म्हणून शालिनी पॅलेसची ख्याती आहे.