मळगे बुद्रुकचे जागृत ग्रामदैवत
कागल तालुक्यातील पश्चिमेस सुमारे चार-हजार लोकसंख्या असलेल्या मळगे बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची देवाची यात्रा … त्यानिमित्त या देवस्थानाविषयी..
शंभू महादेव शंकराचा अवतार श्री भैरवनाथ यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या मळगे बुद्रुक गावात दरवर्षी महाशिवरात्रीनंतर येणारा रविवार हा उत्सवाचा जागर दिवस असतो. या देवस्थानाविषयी माहिती अशी मिळते की, केदारनाथ, जोतिबा, महालक्ष्मी, भैरवनाथ या दैवता शंकराच्या आदेशाने रत्नासुर कोल्हासुर, व्याघ्रासुर, मल्हासुर, हारासुर या राक्षसांना मारण्यासाठी प्राचीन काळी दक्षिणेकडे रवाना झाल्या.
श्री भैरवानाथाने मल्हारी मार्तडाच्या रूपाने मल्हासुर व हारासुरांचा वध केला. त्यानंतर श्री भैरवनाथ, जोतिबा, महालक्ष्मी यांना व्याघ्रासुराने फार त्रास दिला होता. त्यावेळी जोतिबाने मायावी व्याघ्रासुर बेडकाच्या रूपात लपून बसला असल्याचे आपल्या दैवी शक्तीने पाहिले. त्यावेळी भैरवनाथाला नाग रूपाचा अवतार घ्यावयास लावला व बेडूकरूपी व्याघ्रासुराला गिळून वध केला. त्यामुळे या गावात श्री भैरवनाथाच्या साक्षीने आजही श्री नागेश्वराच्या पूजेला महत्त्व आहे. अष्टभैरव व शंकराचे गण सर्व क्षेत्राचे रक्षण करत असल्यामुळे भैरवनाथाला क्षेत्रपाल असे संबोधले जाते. भगवान शंकराचा मानसपुत्र श्री क्षेत्रपाल म्हणून या देवाची ख्याती आहे.
आज गावाच्या मध्यवर्ती असलेल्या रेखीव मंदिरात पुरातन काळापासून पाषाणाची मूर्ती व मंदिर आहे. त्या काळी लोकवर्गणी व श्रमदानातून बांधलेल्या या मंदिराच्या उभारणीत कै. अप्पाजी गावडोजी पाटील यांचेही योगदान मोठे आहे. त्यानंतर त्यांचे सुपुत्र कै. बाळाराम व अलीकडच्या काळात त्यांची मुलेही कार्यरत असतात. पुरातन काळातील स्वयंभू मूर्तीची यवनांच्या काळात मोडतोड झाली होती म्हणून 1940 च्या सुमरास प्रतिष्ठापना करण्यासाठी ग्रामस्थांना भैरवननाथाने कौल न दिल्याने ती तशीच होती. 1990 मध्ये ही मूर्ती पैलवान ह.भ.प. कै. हरिभाऊ विठ्ठल पाटील, ह.भ.प. कै. विठ्ठल यशवंत गुरव, ह.भ.प. विठ्ठल कृष्णा चौगले, ह.भ.प. हिंदुराव बाळाराम पाटील यांच्या सर्वाच्या पुढाकाराने बसवली.
गारगोटीचे वेदाचार्य कै. कृष्णमकाका शुक्ल व मुरगूडच्या रामकाका जोशी यांनी वैडिक पद्धतीने हा सोहळा ग्रामस्थांच्या साक्षीने पार पाडला होता. या श्री भैरवनाथाच्या सुंदर आकर्षक मूर्तीसह मंदिरात महादेव, गणेश, नंदी हे रक्षक आहेत. अष्टमासिद्धी व नागदेवता या मूर्तीही आहेत. मंदिरासमोरच छोटय़ाशा मंदिरात भवेश्वरी व हनुमंत हे देव आहेत. रविवार हा मुख्य दिवस असलेल्या या मंदिरात दसरा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, अधिक मासातील भजन, पारायण, कीर्तन मोठय़ा भक्तिभावाने होतात. दर रविवारी संध्याकाळी सात वाजता नित्यनियमाने देवाची पालखी निघते. देवाचे गुणगौरव, आरती आदी गीतगायन होते. नवसाला पावणारा व सच्चाईला पाठबळ देणारा अशीच या देवाची ओळख आहे.
गावाची यात्रा म्हणजे गावाचा मोठा सण असतो. यात्रेसाठी संपूर्ण गावा आतुरलेला असतो. महाशिवरात्रीनंतर येणार्या रविवारी जागर दिवस असतो. या दिवशी उपवास व सूर्य मावळताना तलवारीने बकरा बळी दिला जातो. तसेच मंदिरात दर्शनासाठी माघारणींची, सुवासिनींची गर्दी असते. देवाची पालखी निघते. मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. पालखीवर भक्तगण मोठय़ा उत्साहाने गुलाल, खोबर्याची उधळण केली जाते.
मंदिरासमोर सासनकाठय़ा नाचवल्या जातात. रात्रभर भक्तगण दंडवत व सासनकाठय़ा घेऊन वाद्यवृंदाच्या गजरात देव भेटीस येतात. मध्यरात्री एक वाजता कै. कृष्णाजी धोंडी पाटील यांच्या घराण्यातून मानाचा दंडवत येतो. त्यानंतर पहाटे तीन वाजता देवाचा पालखी सोहळा असतो. विठ्ठल शिवाजी पाटील, पांडुरंग भागोजी पाटील, बाळाराम अप्पाजी पाटील या तीन घरांमधील व फिरती पाटीलकी असलेल्या घरातून असे मानकरी पालखीसोबत असताना गावातील बारा बालुतेदार सेवेकरी म्हणून पालखीसोबत असतात. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता गार्हाणी असतात. भक्तिमय वातावरणात ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा पार पडते. यात्रेच्या निमित्ताने गावात स्वच्छता, दारात रांगोळी, घरात रंगरंगोटी केली जाते. पै-पाहुण्यांची, मित्रमंडळींना निमंत्रण दिले जाते.
गावात आठ दूध संस्था, दोन सेवा संस्था व गावाला लाभलेले मोफत ग्रामवाचनालय व हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक शाळा तसेच तीन अंगणवाडय़ा आहेत. गावात वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा आहे. वारकरी मंडळींची संख्या मोठी आहे. प्रत्येक वर्षी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह मोठय़ा उत्साहाने, आनंदाने साजरा केला जातो. भजन, कीर्तन, गाथा, पारायण, आदीमुळे गावात भक्तिमय वातावरण असते. अखंड हरिनाम सप्ताह समाप्तीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
