नवा राजवाडा(शाहू म्यूझियम)
दसरा चौकातून शहराच्या उत्तरेकडील भागात तीन कि. मी. अंतरावर नवा राजवाडा मोठ्या डौलाने उभा आहे. या राजवाड्याचा नकाशा मेजर मँट या वास्तुशिल्पकाराने बनविला आहे. आणि तो तयार होण्यास सन १८७७ ते १८८४ असा सात वर्षाचा कालावधी लागला.
त्याकाळी त्याची किंमत सुमारे सात लाख रुपये होती. याची दर्शनीय बाजू दक्षिणेला असून राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या उंच मनोऱ्यावर एक भलं मोठं घड्याळ चारही दिशेने वाढत असलेल्या करवीर नगरीची शान पाहत आहे. या मनोऱ्याची उंची १३५ फूट आहे. राजवाड्याच्या एका बाजूला दरबारगृह व बिलिअर्ड खेळण्याची खोली असून दूसऱ्या बाजूला दोन मोठ्या खोल्या स्वागत प्रतिक्षेसाठी आहेत.
मागील बाजूस मोठा खुला चौक असून त्याच्या मध्यभागी एक कारंजा आहे. मुख्य राजवाडा दुमजली असून त्याच्यावर लहान मोठे मनोरे व घुमट आहेत. मिश्र शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ठ व तितकाच सुंदर नमुना आहे. हा राजवाडा, त्या समोरील छोटा तलाव, तलावाकाठी छोटे राखीव जंगल आणि त्यातून हिंडणारी हरणे व इतर प्राणी, वाड्याभोवतालचा रम्य परिसर मनाला मोहविणारा आहे.
श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान. राजवाड्याच्या काही भागात सध्या शाहू महाराजांच्या काळच्या ऐतिहासिक वस्तू व शिल्प यांचे संग्रहालय करून स्मारक म्हणून राखून ठेवले आहे. छत्रपती शाहूंची मौल्यवान छायाचित्रे व पेंटिग्ज, त्यांनी शिकारीसाठी व लढाईमध्ये वापरलेल्या बंदुका व अन्य शस्त्रे, शिकारीत मिळालेली जनावरे आकर्षक पध्दतीने मांडलेली आहेत.
या राजवाड्यातील भव्य दरबार हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील उत्कट प्रसंग इटालियन चित्रकाराने चितारलेले आहेत. पूर्वी दरबार भरत असताना ज्या पध्दतीने सजवला जात असे त्याच पध्दतीने सजवून तो प्रेक्षकांपुढे मांडलेला आहे, हे दरबार हॉलचे वैशिष्ट्य. राजवाड्याचा परिसरही उद्याने व हिरवळीने नटलेला आहे. हे म्युझिअम सोमवारी बंद असते. इतर दिवशी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत खुले असते.






