किल्ले रांगणा
सृष्टीच्या सामर्थ्याचे शिखर आणि मानवी करामतीचा कळस म्हणजेच बुलंद बाका किल्ले रांगणा. किल्ल्यात रांगडा किल्ले रांगणाच. त्याचे अक्राळ विक्राळ रूप शतकानुशतके कायम आहे. रांगण्याच्या रचनेला नेमके हे स्थान कुणी आणि केव्हा हेरले असावे याचा विचार न करताच त्याची उपयुक्तता ओळखणारा दर्दी माणूस पल्लेदार दृष्टीचा असला पाहिजे हे मनाला पटते. आजच्या सुधारलेल्या साधनाच्या सहाय्याने रांगणाच्या परिसरात प्रवेश करणे म्हणजे एक दिव्य आहे.
मग काही शतके मागे वळून त्या काळातील लोकांनी ही जी अजब किमया करून ठेवलेली आहे, त्याबद्दल आश्चर्य आणि अचंबा वाटला नाही तरच नवल!
कोल्हापूरच्या थेट दक्षिणेला ९५ कि.मी. वर कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सरहद्दीवर रांगणा किल्ला आहे. कोल्हापूर गारगोटी हे अंतर ४८ कि.मी. आहे. गारगोटीचे ग्रामीण विद्यापीठ म्हणजे मौनी विद्यापीठ. येथून पुढे साधारण ३५ कि.मी. गेल्यावर मौनी महाराजांच्या वास्तव्याचे ठिकाण पाटगांव हीच रांगण्याला दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविणारी पूर्वीची पेठ. एस.टी बसेस येथपर्यंत येतात. पाटगांव पासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर हणमंता घाट आहे.
या घाटातून नवीन रस्ता काढून कोल्हापूर ते वेंगुर्ले हा गोव्याला जोडणारा हमरस्ता होण्याचा संभव आहे, असे बऱ्याच वर्षापासून ऐकिवात आहे. घाटाच्या तोंडाला तांबेवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. पाटगांवपासून तांबेवाडीपर्यंतचा रस्ता अगदी ओबडधोबड आहे. तांबेवाडीपासून एक पायवाट रांगण्याकडे वळते. सुमारे ८ कि.मी. चे अंतर तोडून जाईपर्यंत तीन खोल दऱ्या ओलांडाव्या लागतात. निबिड अरण्याची आठवण करून देणाऱ्या दाट झाडीतून हा रस्ता जातो.
या जंगलात काही हिंस्त्र पशू हिंडत असतात असे येथील रहिवाशांच्या माहितीवरून कळते. चिक्केवाडी हे आठ दहा घरांचे वस्तीवजा गांव तांबेवाडीपासून ६-७ कि.मी. वर आहे. चिक्केवाडीपासून रांगण्याची चढण सुरू होते. अंदाजे दीड कि.मी. वर झाडा-झुडपांचा पहाड पालथा घातल्यानंतर रांगण्याचे पहिले प्रवेशद्वार आपल्या भग्न अवशेषांचे दर्शन घडविते. तांबड्या दगडांच्या भिंतीचे फक्त काही भाग दिसतात.
भोवती खंदकांची खुदाई स्पष्टपणे दिसते. पुढे लागणारा सपाट भाग म्हणजे रांगण्याची इतिहासकालीन बाजारपेठ. अवतीभोवती बरीच घरे असावीत असे अनुमान काढता येते.पाण्याची दगडी कुंडेही दिसतात. जर पुढे एक पडक्या अवस्थेत असणारे लहान देवालय आहे. याशिवाय बाकीचा भाग जंगल आणि दगड यांनी व्यापलेला आहे.
रांगणा किल्ल्याच्या मुख्य भागाशी हा भाग जोडणारा कडेतूट असा पूलवजा पर्वताचा काही सपाट भाग आहे. दोन्ही बाजूला खोल दऱ्या आणि मध्येच हा उंच सपाट भाग मुद्दाम खडक फोडून तयार केल्याप्रमाणे वाटतो. या सपाट मैदानावर उभे राहिले तर अगदी समोरच रांगण्याचा खडा बुरूज दिसतो. या बुरूजापासून दोन्ही बाजूंना तटबंदी करण्यात आलेली आहे.
डाव्या बाजूच्या तटाखालून अखंड कडा तोडून केलेल्या पायवाटेने किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी पुढे जात असता वर नजर न पोहोचेल इतका उंच तट आणि खाली अंत न लागणारी दरी असे विलक्षण दृश्य दिसते. दोन फर्लांग वाटचालीनंतर रांगण्याच्या पहिल्या दरवाज्यात आपण येतो. ऐतिहासिक इमारतींच्या जुन्या बांधकामाची खास वैशिष्ट्ये अधिक प्रकर्षाने येथे दिसतात.
मोठमोठे दगड आणि अति नाजूक-नक्षीकाम तर सर्वत्रच अनुभवास येणारी गोष्ट आहे. पहिल्या दरवाजापासून दोन्ही बाजूंना उंच दगडी भिंती बांधून काढल्या आहेत. भिंती सध्या पडत चालल्या आहेत. वर चढताना लागतो दुसरा भव्य बुरूज आणि भक्कम दरवाजा. पठारावर आल्यावर उजव्या बाजूला पुन्हा छोट्या वाड्याचा आकार दाखविणारी एक चौकट आणि भिंत दिसते.
आत एक कायम पाणी पुरविणारी विहीर आहे. पुढेच तिसरा कमानीचा दरवाजा व तांबड्या दगडाच्या भिंती, कमानीत विसाव्यासाठी दोन्ही बाजूला ओवऱ्या. या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर मात्र अगदी मोकळया विस्तृत पठारावर येतो. एकीकडे दर्यापर्यंतची कोकणसृष्टी आणि दुसरीकडे डोंगरदऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत. दृष्टीसुखाचा लाभ घेत उत्कंठेने पुढे गेल्यावर एका मोठ्या तलावाच्या काठावर आपणाला थांबावे लागेल.
या तलावाची फक्त एक बाजू बांधीव आहे. पाण्याचा साठा खूपच मोठा असून तो सदैव टिकतो. तलावापासून काही अंतरावर रांगणाईचे जुने मंदिर आहे. येथील दगडी मूर्ती फार दिवसापूर्वीची असावी असे वाटते. वरचे पत्र्याचे छप्पर अलिकडचे आहे. मूळच्या बांधकामापैकी लाकडावरील नक्षीकाम उत्कृष्ट आहे. मंदिरासमोर काळया चिरांची उंच दीपमाळ आहे.
या ठिकाणी उघड्यावर असलेल्या हनुमानाच्या मूर्तीवरून तेथेही कदाचित हनुमान मंदिर असावे. या मंदिरापासून थोडी चढण चढून दाट झाडीतून किल्ल्याच्या दूसऱ्या टोकाला जाता येते. हनमंता घाट सावंतवाडी ते वेंगुर्ला हा परिसर आणि समोरचे मनोहर व मनसंतोष हे गड येथून स्पष्टपणे दिसतात. या बाजूला तीन दरवाजे आहेत. सर्वच मोडक्या स्थितीत. समोर मात्र भयाण दरी पसरलेली आहे.
रांगण्याचा विस्तार तीन कि.मी. लांबीचा आणि जवळ जवळ एक कि. मी. रूंदीचा आहे. पाण्याच्या अनेक टाक्या या पठारावर आहेत. रायगडावरून कोकण कर्नाटकाकडे जाताना शिवाजी महाराज या किल्ल्यावर थांबत होते असे म्हणतात. सहजासहजी कुणाच्याही टप्प्यात न येणाऱ्या जागी रांगण्याची स्थापना आणि रचना असल्यामुळे तो आजच्या घटकेला सामान्य लोकांपासून दूरच राहिला. रांगण्याचा इतिहास जंगल पहाडांनी दडपला गेला असल्यामुळे तो अनेकांच्या नजरेत भरत नाही.
पण रांगणा वगळला तर महाराष्ट्नच्या इतिहासात अपुरेपणा राहील. एैतिहासिकदृष्ट्या गोव्यापासून पन्हाळयापर्यंतच्या प्रदेशात हे एक महत्वाचे ठिकाण मानले जात असे. रांगण्याची सहल ही शारिरीक श्रमाची कसोटी आहे.
रांगणा गड हा प्रसिद्ध गड या नावाने मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर प्रांताची राजधानी सर्व काळात ज्या किल्ले पन्हाळयावर होती, त्याच्या दक्षिणेस अंदाजे ५० मैलावर हा दुर्गम, बलाढ्य, गनिमालाही सहजासहजी हार न जाणारा किल्ला आहे. भुदरगड तालुक्यातील मौनी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पाटगांवपासून रांगणा जवळ आहे.
किल्ल्याचा परिसर ३०० वर्षापूर्वी घनदाट जंगलाने वेढलेला असावा. आजही एवढी चोरटी जंगलतोड होत असतांनाही एवढी झाडी आहे की अगदी पायथ्याशी गेले तरी किल्ला सहजासहजी नजरेस येत नाही. सह्याद्रीच्या ऐन माथ्यावर अशा जागी हा दुर्ग बसविला गेला आहे की, जेथून संपूर्ण कोकण प्रांतावर नजर ठेवता येते. या गडाच्या बुरूजावरून जे सूर्यास्ताचे नयनमनोहर दर्शन घडते, ते वर्णनातीत आहे. इथून दूरवर असणारी सागर रेखा दृष्टीक्षेपात येते.
रात्री या ठिकाणावरून वेंगुर्ल्याच्या बंदरात उभ्या असलेल्या जहाजांचे दिवे दृष्टीस पडतात. ऐन मोक्याच्या ठिकाणी उभा राहून टेहळणी करण्याच्या दक्ष सैनिकांसारखा हा किल्ला येथे उभा आहे. रांगण्यावरून मनोहर, मनसंतोष गडासारखे डोंगरी किल्लेही नजरेस पडतात. `मावळपट्टा’ म्हणून गणल्या जाणाऱ्या प्रदेशात हा किल्ला येतो.
खोल दऱ्याखोऱ्यांनी घेर धरलेल्या रांगण्याभोवतीचा निसर्ग तसाच रमणीय आहे. या गडावर रागंणाईचे प्राचीन मंदिर तेवढे इतिहासाची साक्ष देत उभे आहे. एक सुंदर तळेही तेथे आहे. मध्यंतरी या मंदिरातील प्राचीन मूर्ती चोरीस गेली.