पाणी पुरवठा

कोल्हापूर शहराच्या बाल्यावस्थेपासून १८व्या शतकाया अखेरीपर्यंत शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. कारण शहरात अनेक तीर्थे व तलाव होते व त्यांचे पाणी पिण्यास योग्य होते. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला.

इ.स. १७८२ मध्ये कोल्हापूर राजधानी बनल्यावर पाणी पुरवठ्याची पहिली योजना हाती घेतली गेली. १७९२ साली कात्यायनीहून नळ घालून शहरात पाणी आणून ते शहरातील निरनिराळया ठिकाणच्या ३२ विहिरीमध्ये सोडले गेले. इ.स. १८८१ ते ८३ च्या दरम्यान कळंबा तलाव बांधला गेला. परंंतु त्याचा फक्त ४० हजार लोकसंख्येला पुरेल इतकाच पुरवठा असल्याने शहराच्या वाढीबरोबर पुन्हा हा प्रश्न समोर उभा राहिला. म्हणून १८९४ मध्ये कळंबा धरणाची उंची वाढवून तलावातील पाण्याचा साठा दीडपट वाढवला. शाहूपुरी, राजारामपुरी इत्यादी भागातील लोकांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बापट कँपजवळ पंपिंग स्टेशन बसविण्यात आले व टेंबलाई टेकडीवर पाण्याचा खजिना बांधला गेला.

हे प्रयत्न देखील अपुरे पडू लागल्यावर दरबाराने १९४१ ते ४९ च्या दरम्यान एक मोठी योेजना हाती घेतली व अंदाजे ३० लाख रूपये खर्चून ती पुरी केली. या योजनेप्रमाणे कळंबा तलावाचे पाणी सिंमंेट नळ घालून शहरात आणले गेले. शहराबाहेर पाणी शुद्धीकरणाचीही योजना हाती घेतली गेली. बापट कँप हे स्टेशन शहरातील सांडपाणी मिसळल्यानेे पाणी घाण होत असल्यामुळे बंद करण्यात आले व त्या ऐवजी बालिंगा येथे शहराच्या पश्चिमेकडील भागात नवीन पंपिंग स्टेशन बसविले गेले. तेथून पाणी पंपिंग व शुद्धीकरण करून त्याचा साठा चंबुखडी टेकडीवरील नवीन खजिन्यात केला गेला. या ठिकाणाहून सर्व शहराला पाणी पुरवठयाची सोय केली गेली.

पण कोल्हापूरच्या वेगाने होत गेलेल्या विस्तारीकरणाने व वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचे वरील सर्व प्रयत्न अपुरेच पडले. त्यामुळे अलिकडच्या कालावधीत शहराला स्वच्छ व विपुल पाण्याचा पुरवठा हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे पहावयास मिळत आहे. अस्वच्छ व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अधुनमधून जनआंदोलने उभी रहात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीप्रश्नाची सोडवणूक हा प्रश्न कोल्हापूर महानगरपालिकेसमोरील सर्वांत मोठा विषय बनला आहे. यासाठी विविध पातळीवर गेल अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू राहिले. कोल्हापूर पाणीप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बहुचर्चित शिंगणापूर योजना अंमलात येण्याचे आशादायक चित्र दिसू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »