मध्ययुग
मध्ययुगीन कोल्हापूर
ब्रम्हपुरी शहराचा दुसऱ्या शतकात नाश झाल्यावर या भागाचे महत्व कमी झाले इ.स. ५०० पर्यंतच्या शिलालेखात कोल्हापूरचा स्वतंत्र उल्लेख आढळत नाही. इसवी सन २०० ते ८०० पर्यंतच्या काळात कोल्हापूरला राजकीय किंवा धार्मिक महत्त्व नव्हते. म्हणून या सहा शतकांना कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते.
श्री महालक्ष्मीच्या देवालयाने या रात्रीचा शेवट केला इसवी सन ९ व्या शतकाच्या दरम्यान या देवालयाची पूर्तता झाली चालुक्य राजवंशातील राजा कर्णदेव यांनी इसवी सन ६३४ मध्ये श्री महालक्ष्मीचे देवालय बांधले. परंतु या देवालयाचे बांधकाम बरेच दिवस चालू होते. हे देवालय एकाचवेळी व एकाच राजाने न बांधता वेळोवेळी अनेकांनी त्यांची वाढ केली किवा त्यात सुधारणा केली. देवालयाच्या पूर्णतेनंतरच कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र संपून उत्कर्षास सुरूवात झाली.
श्री महालक्ष्मीच्या देवालयाबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे की हे देवालय एका रात्रीत बांधले गेले. खोल विचार करता हे अर्धसत्य असल्याचे आपणास पटते. या दंतकथेतील सत्य इतकेच की ती रात्र नेहमीची १२ तासाची नसून सुमारे २०० वर्षापेक्षा जास्त काळाची आहे. ही रात्र म्हणजेच करवीरच्या इतिहासाची रात्र होय. इ.स.२०० ते ८०० वर्षाचा काल हा कोल्हापूरच्या इतिहासाची रात्र असे मानले जाते हे वर उधृत केले आहे. आणि याच ऐतिहासिक रात्रीच्या शेेवटच्या दोन शतकात हे महालक्ष्मीचे देऊळ बांधले गेले आहे. तेव्हा आपण हेे लक्षात घेतले पाहिजे की एखादी दंतकथा जेव्हा तयार होते ती कोणत्या ना कोणत्या तरी अल्पशा का होईना सत्यावर आधारीत असते. एक लहान बिंदू मध्याभोवती हवे तेवढे मोठे वर्तुळ निर्माण करता येते, तसेच अल्पशा सत्यांशावर अतिशयोक्तीपूर्ण दंतकथा निर्माण हेात असते.
श्री महालक्ष्मी देवालयाशी संबधित एक वैशिष्ट्य वा वैचित्र्य दिसून येते. सर्वसाधारणपणे उंचवट्याच्या जागा किंवा टेकड्यावर देवालये बांधली जातात. परंतु या देवालयाच्या बाबतीत पाहिले असता, हे देवालय अगदी सखल भागात बांधले आहे. या देवालयामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही दिशेने आले तरी खाली उतरावे आगते. सध्या देवळाभोवती दाट वस्ती असल्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीची स्पष्ट कल्पना येत नाही. ही जागा सखल, दलदलीची व जवळूनच ओढा वाहणारी होती. अशा जागेत देऊळ का बांधले गेले हे जरी सांगता येत नसले तरी एवढे मात्र सत्य की अशा घाणेरड्या व दलदलीच्या जागेवर देऊळ बांधल्यामुळे तिचे नंदनवन झाले. मेजर ग्रॅहमने कोल्हापूरला करवीर असे का म्हणतात याचे कारण सांगितले आहे. महालक्ष्मीने आपल्या कराने हा प्रदेश प्रलय काळाच्या पाण्यामधून वर उचलला (वीर) म्हणून त्याला करवीर असे म्हणतात. करवीर महात्मामध्येही अशाच अर्थाचा उल्लेख आहे. याचा भौगोलिक अर्थ एवढाच की, हा भाग प्रथम सखल व दलदलीचा होता, आणि या देवालयामुळे तो वर उचलला जाऊन स्वच्छ व सुंदर झाला.
श्री महालक्ष्मी देवालय स्थापन झाल्यांनतर प्रथमच करवीर हा शब्द वापरलेला आढळतो. तत्पूर्वी या शहराचा उल्लेख करताना कोल्हापूर, कोल्लपूर, कोलगिरी, कोल्लादिगिरी पट्टण इत्यादी नावे वापरलेली दिसून येतात. महालक्ष्मीचे देवालय स्थापन होण्यापूर्वी व त्यानंतर अनेक शतकांपर्यंत या शहराचे जुने व सार्वसंमत असे नाव म्हणजे कोल्लापूर म्हणजे दरीतील गाव. कोल्लादिगिरीपट्टण याचा अर्थ थोडासा विस्तारित पण तसाच आहे. कोल्ला म्हणले सखल भाग, गिरी म्हणजे डोंगर वा पर्वत, ददिगिरी(द-दि+गिरी) म्हणजे पर्वताने व डोंगराने वेढलेले शहर वा गांव. भौगोलिक दृष्टीने हे नाव सार्थ आहे. पंडित वा पुजारी वर्गाने कोल्लापूर याचा अर्थ अडाणी लोकांना पटवून सांगण्याकरिता अक्कल हुषारी वापरून, घाणेरड्या जागेचा महालक्ष्मी देवालयामुळे नाश झाला असे सांगण्याऐवजी कोला नावाच्या राक्षसाचा महालक्ष्मीने वध केला,
अशी दंतकथा निर्माण केली. अडाण्यांना पटवून सांगण्याचा हा एक प्रामाणिक उपाय किंवा प्रयत्न आहे. कालांतराने शब्दाचा मूळ अर्थ विसरला गेल्यामुळे शहाण्या सुशिक्षित लोकांना ती दंतकथा वाटू लागली इतकेच आणि आजही कोणी शब्दाचा मूळ अर्थ व कथेचा उद्देश लक्षात घेत नसल्यामुळे तिला दंतकथाच मानले. एकोणिसाव्या शतकापर्यंम्त कोल्लापूर अगर कोलापूर असेच शब्द वापरले जात होते. कोला या शब्दावरून व्युत्पती रूढ झाल्यावर त्या शब्दाचा उच्चार कोल्हा असा झाला असावा. किंवा कोल्लापूर या शब्दाचे कानडी वळण टाकून त्याला शुद्ध मराठी स्वरूप देताना या ह कराचा प्रवेश झाला असण्याची शक्यता अधिक आहे. श्री महालक्ष्मी देवालयानंतर कोल्हापूरचे साध्या गावामधून प्रथम तीर्थामध्ये व नंतर महातीर्थामध्ये रूपांतर झाले.
राजकीय केंद्र
अल्पावधीतच कोल्हापूर हे केवळ धार्मिक क्षत्रे न राहता, राजकीय केंद्रही बनले. राष्ट्रा्कूटानंतर इ.स. १२ व्या शतकात कोल्हापूर व परिसरात वंशाच्या राजांचे राज्य होते. त्यानंतर या भागात देवगिरीच्या यादवांचे राज्य स्थापन झाले व त्यंाच्या एका प्रांताची राजधानी कोल्हापूर ही होती. याचा अर्थ कोल्हापूरला ११ व्या शतकानंतर पुन्हा राजधानीचे स्वरूप आले. परंतु यावेळी ही राजधानी ब्रम्हपुरीवर न होता महालक्ष्मीच्या देवालयाजवळ ठेवली गेली. इ.सन. १३०६ ते १३०७ मध्ये देवगिरीच्या यादवांचा मुसलमानांनी पाडाव केला. तेव्हापासून ते इ.स. १६५९ साली थोरल्या शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकेपर्यंत या भागात मुसलमानांचा अंमल होता. त्यांनी श्री महालक्ष्मी देवालय हेच केंद्र समजून आपली वसाहत केली. त्यांचा राजवाडा हल्लीच्या जुन्या राजवाड्याच्या जवळच कुठेतरी असावा.
त्यांनी तीन मोठ्या मशिदी देवालयाच्या जवळच व सभोवती बांधल्या. आश्यर्य म्हणजे एकाही मुसलमान राजाने महालक्ष्मी देवालयाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला नाही. (खुद्द औरंगजेबही कोल्हापूरला येऊन गेला होता) याचे कारण म्हणजे इथल्या हिंदूंना त्यांनी सहिष्णूतेची वागणूक दिली असावी. १७ व्या शतकात छ. शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची स्थापना केली व कोल्हापूरास छत्रपतींचे राज्य सुरू झाले. त्यानंतर ताराबाईने करवीर राज्यांची स्थापना केल्यामुळे कोल्हापूराचे महत्व त्याला प्राप्त झाले. इ.स. १० व्या व ११ व्या शतकापासून चालत आलेल्या या परंपरेला अनुसरून छत्रपतींनीसुद्धा श्री महालक्ष्मीचे देवालय केंद्र मानून कुलस्वामिनी भवानीचे देवालय व राजवाडा श्री महालक्ष्मीचे देवालयाशेजारीच बांधला.
श्री महालक्ष्मी देवालयाचा पूर्वीच्या सहा नैसर्गिक केंद्रावर झालेला परिणाम:
श्री महालक्ष्मीचे देवालय हे ब्रम्हपूरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, व रावणेश्वर या सहाही केंद्राच्या मध्यभागी स्थापिले गेले आणि देवालयाभोवती वसाहती होऊन त्यांना धार्मिक व राजकीय महत्व प्राप्त झाल्यामुळे ही सहाही केंद्राकडून मध्यवर्ती केंद्राकडे वसाहत वाढू लागली. सर्व सहा नैसर्गिक केंद्र व महालक्ष्मी देवालयाची वसाहत पूर्णपणे एक होण्यास जवळ जवळ एक हजार वर्षाचा कालावधी लागला. मध्यवर्ती केंद्रात अनेक कारणांमुळे जागा न मिळाल्यामुळे इतर सहाही केंद्राची वस्ती वाढू लागली व काही काळाने शहर व उपनगरे अशी स्थिती निर्माण झाली. पुढे उपनगरे विस्तृत पावून ती शहरात मिसळून गेली. त्यामधून १९ व्या शतकातील मोठ्या कोल्हापूर शहराचा जन्म झाला.
ही सर्व जागा एकत्र जोडली जाऊनही नवीन वसाहतीची गरज भासू लागली. त्यातूनच काही नवीन वसाहती निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यामध्ये शनिवार पेठ व सोमवार पेठ या दोन पेठांचा उल्लेख केला जातो. कुंभार व लोणारी यांचेकरिता किल्ल्याबाहेर खंदकापलिकडे (सध्याची पापाची तिकटीजवळ) सखल भागातील जागा देण्यात आली. शहरानजीक उत्तम शेती असलेली जमीन व तलावांनी व्यापलेली जागा सोडून इतर सर्व जागेवर वसाहतींची स्थापना झाली व जुन्या वसाहतीमध्ये वाढ झाली.